उपमुख्यमंत्री अजित पवारांची रिक्षा चालक संघटनांशी दिलखुलास चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवारांची रिक्षा चालक संघटनांशी दिलखुलास चर्चा

पुणे, दि. 2 जून - सकाळी 9 वाजता कार्यक्रमाची नियोजित वेळ...मात्र अर्धा तास अगोदरच म्हणजे साडे आठ वाजता उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची उपस्थिती...प्रमुख मान्यवर न आल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी गोल खुर्च्या टाकून चक्क रिक्षा चालकांशी दिलखुलास गप्पा मारायला सुरुवात केली...प्रश्न समजून घेऊन उपयाबाबत चर्चा केली...ही घटना आहे.  बुधवारी (दि. 1) रोजी घडलेली सकाळी 7 वाजताची.

पुणे आळंदी रोड येथे रिक्षा टेम्पो व छोट्या बांधवांसाठी पासिंग ट्रॅकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता नियोजित होते. मात्र नियोजित वेळेआधी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेआठलाच कार्यक्रमस्थळी हजर झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी मुंबईला होते. यामुळे त्यांना यायला उशीर होईल, असे बहुतेकांना वाटले. मात्र नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर आल्याने सर्वांचा एकच गोंधळ उडाला.

ते आले तेव्हा प्रमुख पाहुणे उपस्थित नव्हते. इतरही मान्यवर येणे बाकी होते.  त्यामुळे घड्याळाकडे बघत 'अरे मी काय लवकर आलो का' अशी विचारणा केली. या वेळी उपस्थितांनी अर्धा तास अगोदर आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्वांना एकत्र बसायला लावून चर्चा करायला सुरुवात केली.

रिक्षाचालकांचे प्रश्न, त्यांचे कल्याणकारी मंडळ व सध्या सुरू असलेला ट्रॅक व इतर अडचणी याबद्दल चर्चा केली. या नंतर समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल, याबद्दल विचारणा केली.

या वेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव हे देखील लवकरच आले होते. त्यामुळे त्यांच्या देखील तब्येतीची विचारपूस करत अनेक विषयावरती चर्चा केली. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, मुक्त रिक्षा परवाना बंद करणे,  इतर विविध प्रश्नांवर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चर्चा केली.

या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी विविध मागण्यांचे निवेदन देखील त्यांना दिले. त्यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे रिक्षाचालक मालकांचे कल्याणकारी महामंडळ मुक्ता रिक्षा प्रमाणा सह अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा असल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.