संतोष परब हल्ला प्रकरणी आठ दिवसांनंतर नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन ; सिंधुदुर्गात जल्लोष 

संतोष परब हल्ला प्रकरणी आठ दिवसांनंतर नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन ; सिंधुदुर्गात जल्लोष 
सिंधुदुर्ग -

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे आणि राकेश परब या दोघांनाही कणकवली तालुक्यात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. प्रदीप घरत, तर आमदार नितेश राणे, राकेश परब यांच्यासाठी ऍड. सतीश मानेशिंदे, ऍड. संग्राम देसाई, ऍड. राजेंद्र रावराणे आदींनी युक्तिवाद केला.

आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांना कोल्हापूर येथील प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक उपचारासाठी नेण्यात आले. ते या ठिकाणी उपचार घेत आहेत. दरम्यान आज (९ फेब्रुवारी) त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी निर्णय दिला.

या निकालासंदर्भात  माहिती देताना आमदार नितेश राणे याचे वकील ऍड. संग्राम देसाई म्हणाले, 'नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्या दोघांना कणकवली तालुक्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच दर सोमवारी सकाळी १० ते १२ वाजता त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. याशिवाय पोलीस तपासात सहकार्य करतानाच पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा उपस्थित राहावे अशी अट जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली आहे.'

सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष
आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाल्यावर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. कुडाळमध्ये घोषणाबाजी करत फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. कुडाळ, कणकवली, वैभववाडी, देवगडमध्येही फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. नितेश राणेंना जामीन मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.