आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे खर्डा व मिरजगावात पाणीपुरवठा विभागाकडून भरघोस निधी मंजूर!

आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे खर्डा व मिरजगावात पाणीपुरवठा विभागाकडून भरघोस निधी मंजूर!

कर्जत/जामखेड -

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मतदार संघातील नागरिकांच्या सोयीसाठी व मतदार संघाच्या विकासासाठी कायमच प्रयत्नशील असतात. त्यातच जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जामखेड तालुक्यातील मौजे खर्डा व कर्जत तालुक्यातील मिरजगाव या गावांना पाणीपुरवठा विभागाकडून भरघोस निधी मंजूर करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा येथे नळ पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. तसेच या योजनेसाठी 14 कोटी 63 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच कर्जत तालुक्यातील मिरजगावच्या पाणीपुरवठा योजनेस 22 कोटी 85 लाख रुपये निधी पाणी पुरवठा विभागाने मंजूर केला आहे.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी वारंवार पाठपुरावा करून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या सोबत चर्चा केली होती. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत मतदारसंघातील पाण्याची अडचण लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाने यास मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक आमदार रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पूर्वीच्या काळात घाईगडबडीने व योग्य सर्वेक्षण न करता अनेक योजना मंजूर करून घेतल्या जात होत्या. उदा. मिरजगावची पाण्याची योजना कमी क्षमतेची होती. तसेच या योजनेतून अनेक वस्त्या वगळण्यात आल्या होत्या. आमदार पवारांनी त्यांचे फेरसर्वेक्षण करून योग्य क्षमतेने वाड्या वस्त्यांवरील लोकांना न्याय देणारी ही योजना मंजूर करून घेतली आहे.

पूर्वी अनेक योजनांमध्ये विविध गावे, वाड्या वस्त्या या वंचित राहिल्याने त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकलेला नाही. परंतु आमदार रोहित पवार यांनी योग्य सर्वेक्षण करून वाड्यावस्त्यांवरील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अनुषंगाने या योजना सरकारकडून मंजूर करून घेतल्या. कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांसाठी सरकारकडून लागणारी सर्व मदत व सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहू, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.