राज्यात अवकाळी पावसाची सकाळपासून रिपरिप

राज्यात अवकाळी पावसाची सकाळपासून रिपरिप
पुणे -
राज्यात सकाळपासून सर्वत्र अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या द्रोणीय क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून उद्या पासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसात अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. 

अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची दाणदाण उडाल्याचं चित्र आहे. तर पुण्यात सकाळपासूनच धुकं पसरल्यामुळे टेकडीवरून नयनरम्य दृश्य दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात आज सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. साडे आठच्या सुमाराला शहरात काही भागात तुरळक सरी बरसल्या त्यानंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस शहरात बरसला. जळगाव शहरात पहाटेपासून ढगाळ वातावरण असून शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र या बदलत्या ऋतुचक्राचा शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पहायला मिळत आहे. पुढचे तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत असून रोहा, खोपोली, कर्जत, अलिबाग, माणगाव सह अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. 

कल्याण डोंबिवली मध्ये सकाळ पासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर अवकाळी  रिम झिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका बसला आहे.