अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या 7 जुलैला प्रसिद्ध होणार

अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या 7 जुलैला प्रसिद्ध होणार

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 17 जून ते 25 जूनपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. तर, 7 जुलैला अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना दिला आहे.

5 जानेवारी 2022 ते 31 मे 2022 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेल्या, वगळलेल्या अथवा दुरूस्त झालेले मतदार विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम करावे लागणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ज्या ठिकाणी पाऊस कमी तेथे निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्यातील महापालिका निवडणूक प्रक्रिया सद्यस्थितीत वेगाने सुरू आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. आता आयोगाने मतदार याद्यांचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.

महापालिकेने 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करावी. 17 जून ते 25 जून या कालावधीत मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. 7 जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात. त्यानंतर याद्या महापालिका कार्यालयात, संकेतस्थळावर, प्रभाग समिती कार्यालयात प्रसिद्ध कराव्या, अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.