भाजपची सत्ता येताच शिवसेनाप्रमुखांचा फोटो उतरविला !  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील प्रकाराने शिवसैनिक संतप्त 

भाजपची सत्ता येताच शिवसेनाप्रमुखांचा फोटो उतरविला !  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील प्रकाराने शिवसैनिक संतप्त 

सिंधुदुर्ग - 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपची सत्ता येताच आघाडीच्या नेत्यांचे फोटो बँकेतून काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो हटविण्यात आले आहेत. बँकेत फक्त केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे.

जिल्हा बँकेत भाजपच्या झालेल्या विजयानंतर अध्यक्षाच्या दालनातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो तात्काळ काढण्यात आले आहेत. याचं मुद्यावरून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. जिल्हा बँकेत शिवसेना आणि महाविकास आघाडीची सत्ता असताना नारायण राणेंचा फोटो देखील दालनात होता, तो त्यावेळी आम्ही हटवला नव्हता, मात्र राणेंकडे सत्ता गेल्या नंतर त्यांनी आघाडीच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत. ज्या बाळासाहेबांबद्दल राणे नेहमी बोलत असतात त्यांचा आणि शरद पवार यांचा फोटोही दालनातून हटवण्यात आला आहे. यातून राणेंची प्रवृत्ती समोर आली आहे, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

नेत्यांचे फोटो हलवून आम्हाला फरक पडणार नाही. बाळासाहेबांची प्रतिमा तर आमच्या देवघरात आहे. त्यामुळे राणेंनी फोटो हलवले त्यातून त्यांचीच प्रतिमा लोकांसमोर आली आहे, अशी टीका नाईक यांनी केली आहे. तर मनिष दळवी यांनी संतोष परब हल्ल्याचा कट रचला आणि तो यशस्वी केला या कटामुळेच जिल्हाबँकेत मतदारांमधे भयभीत वातावरण झालं होतं. संतोष परब हे सुद्धा मतदार होते. काही मतदारांना आमिष दिली गेली. या भयभीत वातावरणामुळेच जिल्हा बँक भाजपकडे गेली. त्याची परतफेड म्हणून मनिष दळवी यांना जिल्हा बँकेचं अध्यक्ष करण्यात आलं, असा गंभीर आरोपही वैभव नाईक यांनी राणेवंर केला आहे.