राज्यात आणखी दोन दिवस गारठा ; विदर्भात दोन दिवस पावसाळी स्थितीचा अंदाज

राज्यात आणखी दोन दिवस गारठा ; विदर्भात दोन दिवस पावसाळी स्थितीचा अंदाज

पुणे -

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, पुढील दोन दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याने या काळात थंडीचा कडाका कायम राहील. त्यानंतर मात्र किमान तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर तेथे हवामान कोरडे होईल. गुजरात, मध्य प्रदेशात थंड दिवसांची स्थिती असल्याने प्रामुख्याने मुंबईसह कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात किमान तापमान सरासरीखाली येऊन थंडी अवतरली.

दोन दिवसांनंतर उत्तरेकडील थंडीची लाट ओसरणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिमी चक्रवात निर्माण होणार आहे. या घडामोडीत राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. सध्या कर्नाटक ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे या पट्टय़ात काही भागात पाऊस होतो आहे. त्याचा परिणाम विदर्भावरही होत असून, या भागात पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्या उत्तरेकडील राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांत थंडीची लाट आली आहे. गुजरात, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड राजस्थान आदी राज्यांमध्ये थंड दिवसांचे वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तापमानातही घट कायम आहे. सध्या मुंबईसह कोकणात सर्वत्र आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली आहे. त्यामुळे या भागात थंडी कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी वातावरण असल्याने किमान तापमान सरासरीजवळ आहे.

राज्यात काही भागांत दिवसा अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यातच उत्तरेकडून थंड वारे येत आहेत. या दोन्हीचा परिणाम म्हणून राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात मोठी घट दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, कोल्हापूरमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ७ अंशांनी घटले आहे. कोकण विभागात मुंबई परिसर आणि रत्नागिरीत कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी कमी आहे. मराठवाडा, विदर्भातही ते सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी कमी आहे. गुरुवारी महाबळेश्वरमध्ये दिवसाचे तापमान सर्वात कमी १९ अंश सेल्सिअस होते. राज्यात बहुतांश भागात कमाल तापमान २५ अंशांच्या खाली आले आहे.