पिंपरी-चिंचवड, दि. 23 - कोणतीही पूर्व कल्पना न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री नवाब मलिक यांनी पहाटे जबरदस्तीने ईडीच्या कार्यालयात आणले. 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर करून त्रास देत आहे. याच्या निषेधार्ह आज पिंपरी-पिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निदर्शने करण्यात आली.
बीजेपी हमसे डरती है, ईडी को आगे करती है, मोदी जब जब डरते है, तब तब ईडी को आगे करते है, शर्म करो, शर्म करतो, मोदी सरकार शर्म करो, भाजपवाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा संतप्त कार्यकर्त्यांनी या वेळी दिल्या.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी या वेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना म्हणाले की, मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केंद्र सरकार, भाजपच्या विरोधात भूमिका मांडत होते. त्याचा सूड घेण्यासाठीच मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या वेगवेगळ्या एजन्सींचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. केंद्र सरकार सुडाची भावना ठेवून काम करत आहे.
गव्हाणे पुढे म्हणाले की, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्या वरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशा कारवाया केल्या जात आहे. मविआ सरकार चांगले काम करीत आहे. सरकारला पाडण्यासाठी सर्व कारस्थाने निष्प्रभ झाल्यानंतर आता एजन्सींचा वापर केला जात आहे. मोदी सरकार हिटलरपेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे भाजपला त्यांची जागा दाखविली गेली पाहिजे.
राष्ट्रवादी शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता आल्हाट म्हणाल्या की, मंत्री नवाब मलिक यांनी वास्तवाला वाचा फोडली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही खेदजनक बाब आहे. लोकशाहीपद्धतीने काम करणाऱ्या मंत्र्याला केंद्र सरकार एजन्सीच्या माध्यमातून अटक करत आहे. खालच्या स्तराला जाऊन भाजपकडून काम केले जात आहे.