कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करू : शरद पवार

कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करू : शरद पवार

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. संघटनेच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पवारांसाठी हा धक्का मानला जात आहे.

या सर्व प्रकरणावर शरद पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया व्यक्त केली असून नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे. तसेच कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यात मी दिल्लीला जाणार आहे. त्यावेळेस भारतीय कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन काय चुका झाल्या त्या समजून घेऊ. संघटनेने सूचवलेल्या सुधारणा करू आणि राज्य कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील राजकारणाचा आणि या कारवाईचा काही संबंध आहे का? असा सवाल पवार यांना करण्यात आला. त्यावर, छे छे खेळाच्या संघटनेत आम्ही कधी राजकारण आणत नाही. राजकारणाचा संबंध नाही. या संघटनेत अनेक पक्षाचे लोक होते. मुंबई क्रिकेटमध्ये मी होतो. माझ्यानंतर अध्यक्ष झालेले शेलार भाजपमध्ये होते. आज उद्या ते मंत्री होतील. आम्ही एका विचाराने कामे करतो. कधी आमच्या निर्णयात मतदानही होत नाही. कारण क्रीडा संघटनेत आम्ही राजकारण आणत नाही. आमच्याकडून कुस्तिगीर संघटनेत सुधारण्यात विलंब झाला. त्यात सुधारणा करता आली असती. पण केली नाही. पण यात राजकारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा याच्याशी काहीच संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. भारतीय कुस्तीगीर संघटना जरी स्वायत्त असली तरी तिच्यावर भाजपचे दडपण आहे. संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी शरद पवार यांच्याबाबत सन्मानाची भावना व्यक्त केली होती, तेच त्यांना खटकलं. शरद पवार यांना गुरू मानले, हे भाजपला पाहवल गेलं नाही, म्हणून कुस्तीगीर परिषदेवर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. दबावतंत्राचा वापर करुन दिल्लीत झालेल्या परिषदेच्या बैठकीत थातूर मातूर कारणे देऊन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. यामागे भाजपचं राजकारण आहे. सुडाच्या भावनेने राज्य कुस्तीगीर परिषदेवर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तर, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त होण्याला बाळासाहेब लांडगेंचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा आरोप संदीप भोंडवे यांनी केला आहे. संदीप भोंडवे म्हणाले, की मागील काही काही वर्षांपासून बाळासाहेब लांडगे आणि त्यांचा मुलगा यांच्या मनमानी कारभार करून भ्रष्टाचार करत होते. महाराष्ट्रातील विविध कुस्तीगीर संघटना त्यांना जाब विचारत असताना त्यांना कोणतीही दाद ते देत नव्हते. मार्च महिन्यात पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने बालेवाडीत कुस्ती स्पर्धा झाली, त्याचे प्रायोजकत्व सिटी अॅमानोराला देण्यात आले होते. त्या संबंधीच्या करारनाम्याची प्रत सदस्य या नात्याने आम्ही मागितली असता त्यांनी दिली नाही. चार दिवस आमरण उपोषण केल्यानंतरही ती देण्यात आली नाही. शेवटी आम्ही बाळासाहेब लांगडेंविरोधात स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली, असे भोंडवे यांनी सांगितले.

कुस्तीच्या विविध स्पर्धाही मागील दोन वर्षांपासून घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे राज्यातील कुस्तीगीरांचे नुकसान होत होते. पुणे जिल्ह्याला ही स्पर्धा घेऊ दिली जात नव्हती. पुणे जिल्हा आणि पुणे शहराची संलग्नताही त्यांनी रद्द केली होती. या सर्वांच्या बाबतीत शरद पवार तसेच भारतीय कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षांकडेही तक्रार केली. त्यानंतर याची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर वार्षिक सभा घेऊन त्यात सगळ्या खोट्या गोष्टी दाखवल्या. त्यामुळे सर्वांनी त्यांच्याविरोधात एकत्र येत तक्रारी केल्या, असे भोंडवे म्हणाले.