पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; प्रभागरचना प्रारुप आराखड्याच्या तारखा जाहीर !

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; प्रभागरचना प्रारुप आराखड्याच्या तारखा जाहीर !
पिंपरी - 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून प्रभागरचनेचा प्रारुप आरखडा मंगळवारी (दि. १) प्रसिद्ध केला जाणार आहे. या आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी तसेच सूचना करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या हरकतींवर २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून २ मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत १३ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे नोंव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रभागरचनेची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षण, करोना यासारख्या मुद्यांमुळे प्रभागरचनेला वारंवार उशीर होत होता. त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता होती. मात्र निवडणूक आयोगाने अखेर प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीबाबत निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रभागरचना केली जाणार असून त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे.

आयोगाच्या आदेशानुसार आता प्रभागरचना अंतिम करण्याच्या कार्यवाहील सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सन २०२२ ची सार्वत्रिक निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार असून त्याबाबतचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा महापालिका प्रशासनाने १३ जानेवारी २०२२ रोजी आयोगाला सादर केला होता. शुक्रवार (दि. २७) रोजी प्रभागरचनेच्या प्रारुप आराखड्याबाबत महापालिकेला आदेश मिळाले होते. तर आज (शनिवारी) प्रभागरचनेच्या तारखांचे आदेश प्राप्त झाले आहेत.

आराखडा प्रसिद्धीचा कार्यक्रम याप्रमाणे :
. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना  शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे (मंगळवार दि. १ फेब्रुवारी २०२२)
. प्रारुप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागण्याचा कालावधी (दि. १ फेब्रवारी ते १४ फेब्रुवारी २०२२)
. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे
(दि. १६ फेब्रुवारी २०२२)
. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक (२६ फेब्रुवारी २०२२)
. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक (२ मार्च २०२२)
 
तीन सदस्यांचे ४५ तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार !
शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यात अनुसूचित जाती (एससी)ची २ लाख ७३ हजार ८१० आणि अनुसूचित जमाती (एसटी)ची ३६ हजार ५३५ लोकसंख्या आहे. नगरसेवकांची संख्या १३९ आहे.  १३९ नगरसेवकांपैकी ६९ पुरुष तर ७० महिला नगरसेविका अशी वर्गवारी असणार आहे. ११४ जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील. त्यातील ५७ जागा महिलांसाठी असतील. अनुसूचित जाती (एससी)साठी २२ जागा राखीव असतील. त्यात ११ महिला आणि ११ पुरुषांसाठी जागा असणार आहेत. २ महिला आणि १ पुरुषाकरिता अशा ३ जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत एकूण ४६ प्रभाग असणार आहेत. त्यात ३ सदस्यांचे ४५ आणि ४ सदस्यांचा १ प्रभाग असणार आहे.