शहर भाजपचे धाबे दणाणले; फडणविसांचे फोनसत्र सुरू

शहर भाजपचे धाबे दणाणले; फडणविसांचे फोनसत्र सुरू

पिंपरी, दि. 22 - पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधून 25 नगरसेवक पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या वावड्या उठल्या आहेत. सध्या महानगरपालिकेत 77 नगरसेवक भाजपचे आहेत. भाजप पुन्हा 2012 च्या स्थितीवर येतो की काय अशी भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात घबराटीचे वातावरण पसरले आहे. काहींनी थेट माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधून ही गळती थांबवण्याची विनंती केली आहे. फडणवीस यांनीही लगेच पावले उचलली आहेत. फडणवीस स्वतः प्रत्येक नगरसेवकाशी जातीने संपर्क साधत आहेत. पक्ष सोडून जाऊ नये म्हणून ते गळ घालीत आहेत. येणारा काळच त्यांना त्यात किती यश मिळेल सांगेल. तूर्तास भाजप शहर कार्यकारिणीत निराशा पसरली असल्याचे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

 

महापालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधी राष्ट्रवादी असा सरळ सामना रंगणार असल्याचे आजचे सर्वसाधारण चित्र आहे. एकूण १२८ सदस्यांमधील भाजपाच्या ७७ पैकी २४ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाने महापालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभाराबद्दल जो मोर्चा काढला होता, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. वातावरण बदलल्याचे नगरसेवकांच्या लक्षात आले आहे. त्यातच बदललेला प्रभागही भाजप नगरसेवकांच्या मुळावर उठणारा ठरणार आहे, असे भाजप नगरसेवकांचे म्हणणे आहे. पुढच्या पंधरा-वीस दिवसांत भाजपाला मोठे खिंडार पाडायचे अशी राष्ट्रवादीची व्युहरचना केली आहे. नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीससह पक्षाचे दोन्ही आमदार, भाजपाचे राज्यातील बडे नेते प्रयत्न करत आहेत.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून भाजपमधील असंतुष्ट नगरसेवकांच्या मनातील खदखद बाहेर येऊ लागली. काम नगरसेवकांनी करायचे आणि त्याचे श्रेय आमदारांनी घ्यायचे या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. जर ही गळती रोखली गेली नाही तर आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले.