मी नदी बोलतेय..!
जागतिक जल दिन दि. २२ मार्च निमित्त विशेष लेख.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बुधवार, दि. २२ मार्च जागतिक जल दिन…. म्हटलं बोलावं आपल्या लेकरांशी…. तुम्ही माझ्याकडे पहात नसला तरी माझ्या दोन्ही तटावर वाढताना, अंगाखांद्यावर खेळताना तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांनाही मी पाहिलंय, त्याचा आनंदही वेळोवळी घेतलाय. म्हणून तुम्ही विसरलात तरी मला तुमच्यापासून दूर कसं होता येईल? म्हणून म्हटलं बोलावं…काय, मी कोण असे विचारता? तेच तर माझं दु:ख आहे…. जवळ असूनही तुम्ही दूर आहात…. असू देत…. तर मी आहे तुमची नदी!
आज मला नदी म्हणतानाही तुम्हाला लाज वाटते. ही अवस्था कोणामुळे झाली हा विचार तरी केलाय? पूर्वी स्वच्छ व निर्मळ प्रवाह मिरवताना, स्वच्छंदीपणे वाहताना एक वेगळाच आनंद होता. त्यातून तुम्हालाही आनंद मिळायचा. लहान मुले माझ्या प्रवाहात डुंबण्यासाठी यायची. गुर-ढोरे तहान भागवायची. तहानलेला शेतकरी राजा माझी जलधार ओंजळीत घेऊन ओठाला लावायचा तेव्हा काय सुख व्हायचं सांगू…!
कपडे धुण्यासाठी बाया-पोरी यायच्या त्याचंही कधी वाईट वाटलं नाही मला. सगळी घाण पोटात घेवून मी गावागावातून जात अनेकांचे पोषण केले, तहान भागवली, शेत फुलविले. किनाऱ्यावर असलेल्या तीर्थक्षेत्री भरलेला भाविकांचा मेळा किंवा गावाची यात्रा पाहताना डोळ्याचं पारणं फिटायचं. भाविकही श्रद्धेने पावन होण्यासाठी माझ्या भेटीला यायचे तेव्हा देव भेटल्याचा आनंद मलाही व्हायचा.
काळ बदलला, माझं पाणी नवजीवन देणारं असल्याने किनाऱ्यावर वस्ती वाढू लागली. गावाचं शहर झालं, लोकसंख्या वाढली, व्यवसाय-उद्योग सगळं वाढलं. माझं पात्र मात्र आकुंचित झालं. माझा प्रवाह गरजेपोटी ठिकठिकाणी रोखला जाऊ लागला. तरीही माझी तक्रार नव्हतीच. शेवटी माझं वाहणं तुमच्यासाठीच होतं. पण शहरीकरणानंतर माझ्या प्रवाहात सांडपाणी, कचरा टाकला जाऊ लागला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. प्लास्टिक, पुजा साहित्य, खाद्यपदार्थ, कपडे, काचेच्या बाटल्या सर्व माझ्या पात्रात टाकलंत! दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत गेलं.
सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी मला अडवले गेले तरीही पुढच्या गावांना तृप्त करण्यासाठी मी थांबले नाही. माणूस जेव्हा स्वार्थाने माझ्या पात्रातही स्वत:चा हक्क सांगतो तेव्हा खूप दु:ख होते. पावसाळ्यात निसर्गापुढे माझेही चालत नाही आणि माझ्या वेगवान प्रवाहात जेव्हा अशांची वाताहत होते तेव्हा किती वाईट वाटतं कोणाला सांगू? निसर्गावर तुम्ही आक्रमण करू शकतात, मी मात्र निसर्ग नियमांशीच कायमची बांधली गेली आहे.
आज मला तुम्ही नदी म्हणूनही संबोधत नाही, गटारगंगा म्हणून हिणवतात. यात माझी काय चूक? हे सर्व कशामुळे झालेय याचा विचार तरी कधी केलात? मी तर तुम्हा सगळ्यांना सुखावत समुद्राला जाऊन मिळण्यासाठीच पृथ्वीतलावर आले. अशी दूषित धारा घेऊन समुद्रात जाताना मला कसा आनंद होईल? म्हणून आजचा दिवस निवडला तुमच्याशी बोलायला. तुम्ही जल दिन साजरा करीत आहात ना!
आज तुम्ही जलबचतीची, शुद्धतेची प्रतिज्ञा केली असेल. चांगली गोष्ट आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या भविष्यासाठी तेच गरजेचे आहे. माझ्या अस्तित्वापेक्षा तुमच्या अस्तित्वासाठी माझं जगणं महत्वाचं आहे. पाण्याला उगाच जीवन म्हणत नाही. पिण्यासाठी, शेती फुलविण्यासाठी, उद्योगासाठी, विज्ञानाच्या प्रयोगासाठी, पृथ्वीवरील सजिवांसाठी पाणी गरजेचे आहे.
माझ्यामुळे परिसरातील भूजलाची पातळीही वाढते. पृथ्वीवरील एकूण गोड्या पाण्यापैकी अंदाजे ९९ टक्के भूजल आहे. एकूण वापराच्या अर्ध्या भूजलाचा उपसा घरगुती वापरासाठी केला जातो. तर २५ टक्के भूजल सिंचनासाठी वापरले जाते. भूजलाचे महत्त्व योग्यरितीने न जाणल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. भूजलाचा अतिवापर, ते दूषित करणे, त्याचे अतिशोषण यामुळे संपूर्ण जलचक्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मानवी जीवनासाठी ते निश्चितपणे योग्य नाही. म्हणून तुम्हाला सावध करते आहे.
मर्यादीत संसाधने आणि अमर्याद गरजा असल्या की टंचाईची स्थिती येते. पाण्याची उपलब्धता आहे म्हणून अमर्याद उपयोग अशाच टंचाईच्या स्थितीला निर्माण करणारा आहे. जगात ८० टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रीया न करता पर्यावरण साखळीत मिसळते. शुद्ध जलस्त्रोताचे अधिक शोषण न करता सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे पाण्याचा पुर्नउपयोग न केल्यास २०३० पर्यंत जगाला ४० टक्के पाण्याची कमतरता भासू शकते. म्हणून घाण पाणी माझ्या पात्रात सोडण्याऐवजी त्यावर प्रक्रीया करून ते उपयोगात आणा.
तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, आतातरी जागे व्हा. मला जाणून घ्या. माझ्या संवर्धनासाठी पुढे या असे म्हणणार नाही, तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्या जीवनासाठी पुढे या! महाराष्ट्र शासनाने ‘चला जाणूया नदीला’ हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे आणि हेच लक्षात घेऊन राज्यातील ७५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुमचा सहभाग मिळाला तरच हा उपक्रम यशस्वी होणार आहे.
महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या पूर आणि दुष्काळ या समस्यांपासून मुक्तीसाठी नदीशी संवाद साधणे गरजेचे आहे. माझ्याबद्दल माहिती, तटावरील जैवविविधता, माझ्या समस्या जाणून घेतल्या तर भविष्यात तुमचे जीवन समृद्ध करण्यासाठी मला निर्मळ प्रवाहाने वाहता येईल. म्हणून संवाद साधूया!
बरेच दिवस अस्वस्थ होते, म्हणून खूप बोलले. याला रागावणे समजू नका. आईची हाक समजा. तुमच्या गावातली एकच नदी आहे. तीच लुप्त झाली तर तुमच्या भविष्याचे काय?...म्हणून चिंता वाटते. माझ्या इतर भगिनींचीही हीच स्थिती आहे. तेव्हा विचार करा, शेवटी माझ्या अंताची चिंता नाही, माझ्या लेकरांचं काय हाच विचार सारखा मनाला अस्वस्थ करतो. वाहणे आणि पुढे जाणे माझा धर्म आहे, तशी मी जाणार. माझा प्रवाह तुम्हाला सुखावणारा असावा म्हणून मला जाणून घ्या एवढेच…!
- तुमची नदी
(शब्दांकन-डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी पुणे)