कर्नाटक विधानसभेचा निकाल हा २०२४ च्या लोकसभेसाठी दिशादर्शक असेल

कर्नाटक विधानसभेचा निकाल हा २०२४ च्या लोकसभेसाठी दिशादर्शक असेल

लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या आधी देशातील सहा मोठ्या राज्यात निवडणुका होत आहेत. त्यात मे महिन्यात कर्नाटकात निवडणूक होत आहे. ईशान्यतील तीन राज्यांच्या विजयानंतर कर्नाटक काय कौल देतो ते देशाची हवा स्पष्ट करणारे ठरेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
कर्नाटकची लोकसंख्या देश्याच्या लोकसंख्येच्या 5.04 टक्के आहे तर 543 सदस्यांच्या लोकसभेत 28 सदस्य (5.35 टक्के ) या राज्यातून निवडून दिले जातात. उत्तर प्रदेश (80), महाराष्ट्र (48), पश्चिम बंगाल (42), बिहार (40), तामिळनाडू (39) आणि मध्य प्रदेश (29) या नंतर सातव्या क्रमांकावर हे राज्य आहे.
1980 मध्ये भाजपाची स्थापना झाल्यावर त्या दशकात या पक्षाला सुमारे चार टक्के मते आणि दोन ते चार जागा विधानसभेत मिळाल्या होत्या. मात्र 90च्या दशकातील रामजन्मभूमी आंदोलनाने या पक्षाला संजीवनी दिली. 1994च्या विधानसभा निवडणुकीत 40 जागा पटकावत मतांची टक्केवारी 17 टक्क्यावर नेली. त्यानंतर 1999 मध्ये 44 जागा, 2004 मध्ये 44 जागा असा प्रवास घडला.

2007 मध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) ला सोबत घेत भाजपचे येडीयुराप्पा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र आठवड्याभरात हे सरकार कोसळले. 2008 मध्ये पुन्हा 110 जागांची मुसंडी मारत भाजपा सत्तेवर आली.  पुढील  निवडणुकीत म्हणजे 2013 मध्ये भाजपचे सरकार कोसळले.  अवघे 40 आमदार निवडून आले. 2018 मध्ये मोदी लाटेत पुन्हा 104 जागा मिळवत सत्तेवर आली.
कर्नाटकात झालेल्या सर्व 14 निवडणुकांत काँग्रेसची मतदानाची टक्केवारी कायम राहिली आहे. 26 टक्क्यापेक्षा ती कधीही कमी झाली नाही. 2018 च्या निवडणुकीत भाजपला  अधिक जागा मिळाल्या तरी काँग्रेसला 38.04 टक्के मते मिळाली होती. ती भाजपा पेक्षा 2 टक्क्यांनी अधिक होती.