कर्मवीरांनी शिक्षणाच्या माध्यमातून माणूस घडवण्याचे कार्य केले -  कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

कर्मवीरांनी शिक्षणाच्या माध्यमातून माणूस घडवण्याचे कार्य केले -  कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

       पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  - शिक्षणाचा उद्देश ज्ञानाबरोबरच माणूस घडवणे हा आहे. नवीन शैक्षणिक धोरणात खडू, फळा आणि वर्ग यांच्याबाहेर शिक्षण नेले पाहिजे हा हेतू आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत. मन, शरीर आणि बुद्धीचा विकास केला पाहिजे. अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविला पाहिजे. उपलब्धता, समानता आणि गुणवत्तेवर भर दिला पाहिजे. मूल्यशिक्षणाला प्राधान्य द्यायला हवे, मात्र मूल्यशिक्षण हे केवळ वर्गात शिकण्याची गोष्ट नाही. समाजात तसे आदर्श असायला हवेत. तेच आदर्श विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजवत असतात. कर्मवीरांनी आपल्या उक्ती, कृती आणि विचारांमधून आदर्श निर्माण केला. अलीकडे आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची बीजे कर्मवीरांनी ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ यासारख्या ब्रीदवाक्यातून, दूरदृष्टीतून शिक्षणाचे प्रारूप विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातच सुरू केलेले दिसून येते. त्यांच्या एकूणच कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय या पिंपरी संकुलाच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, माजी महापौर संजीगजी वाघेरे पाटील होते. महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या दारापर्यंत ज्ञानगंगा नेऊन बहुजनांचा उद्धार करणाऱ्या कर्मवीरांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायला हवे असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रोफेसर डॉ. माधव सरोदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शहाजी मोरे यांनी करून दिला. कार्यक्रमास मा. भाऊसाहेब वाघेरे, मा.  हनुमंत नेवाळे,मा. अजित नाणेकर, मा. संजय गायके, सौ रुपाली जाधव, सौ.उर्मिला पाटील, मा. मुर्तुजा मोमीन, प्राध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी इतिहास विभागातील प्रा. संदीप नन्नावरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इतिहास विषयातील पीएच.डी. पदवी जाहीर झाली त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. सकाळी पिंपरी संकुलाच्या वतीने पिंपरी गावातून कर्मवीरांच्या विचार - कार्याचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. कर्मवीरांच्या प्रतिमेला माजी नगरसेवक सौ. उषाताई वाघेरे आणि मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सौ. शारदाताई शेटे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रो.डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. अनिता तारळेकर, प्रा. सुनिता चव्हाण यांनी केले