साहित्य ही जगाची तर संगीत ही साहित्याची भाषा - मधू जोशी

साहित्य ही जगाची तर संगीत ही साहित्याची भाषा  - मधू जोशी
*'चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी...'*
*शब्दधन काव्यमंचचा उपक्रम*
पिंपरी (प्रबोधन न्यूज )  -  "साहित्य ही जगाची तर संगीत ही साहित्याची भाषा असते!" असे विचार साहित्य, संगीत, कला, पत्रकारिता, कामगार चळवळ, समाजकारण, राजकारण आणि अध्यात्म या क्षेत्रात सुमारे पासष्ट वर्षे योगदान देणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व मधू जोशी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले . 
शब्दधन काव्यमंच आयोजित 'चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी...' या विशेष उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते मधू जोशी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मधू जोशी बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी - चिंचवड) शाखाध्यक्ष राजन लाखे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक - अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ असे सत्काराचे स्वरूप होते.
मधू जोशी पुढे म्हणाले की, "साहित्याची अन् मनाची श्रीमंती सर्वात मोठी असते. नवोदितांनी झटपट प्रसिद्धीच्या मागे लागू नये. परिपक्वता हा आपल्या लेखनाचा गाभा असला पाहिजे!" गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतातून, "अर्धशतकाहून अधिक काळ पिंपरी - चिंचवडकरांना मधू जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाचा लाभ झाला आहे. त्यांच्या भरीव सहकार्यातून महाराष्ट्रातील पहिले दलित साहित्य संमेलन पिंपरी - चिंचवडमध्ये संपन्न झाले. परस्परविरोधी विचारसरणीच्या व्यक्तींमध्ये समन्वयाची भूमिका घेणे हे त्यांच्या कार्यशैलीचे ठळक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पिंपरी - चिंचवडचा सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. विस्कळीत समाजघटकांना एकत्रित करण्याची शिकवण मधू जोशी यांनी दिली!" असे गौरवोद्गार काढले. 
सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी मधू जोशी यांची विविध क्षेत्रातील वाटचाल कथन केली. श्रीकांत चौगुले यांनी त्यांच्या साहित्यकर्तृत्वाला उजाळा दिला; तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी जोशी यांच्या सामाजिक क्षेत्रातील समयसूचकतेची आठवण सांगितली. राजन लाखे यांनी 'क्षण' या कवितेतून शुभेच्छा दिल्या. 
आय. के. शेख, नंदकुमार मुरडे, कैलास भैरट, डॉ. पी. एस. आगरवाल, सुहास घुमरे, आत्माराम हारे, हेमंत जोशी, श्रीकांत जोशी, अण्णा बिराजदार, अशोक गोरे, सुप्रिया सोळांकुरे, राजेंद्र घावटे यांची सोहळ्यात उपस्थिती होती.
शामराव सरकाळे, मनोज जोशी, स्नेहा जोशी, हेमंत जांभळे, दिलीप जांभळे यांनी संयोजनात सहकार्य केले. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले.