अखेर राहुल नार्वेकरांच्या नावावर विधानसभा अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब

अखेर राहुल नार्वेकरांच्या नावावर विधानसभा अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - 3 आणि 4 जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आले आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी अनेक बैठका पार पडल्या. बैठकीत अनेक नावांवर काथ्याकुट झाल्यानंतर शेवटी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज संध्याकाळी बैठकदेखील झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरुवातीला राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. राधाकृष्ण पाटील हे ज्येष्ठ नेते असून ते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे सर्वपक्षीय त्यांचे संबंध चांगले आहेत. त्याचबरोबर विधिमंडळ कामकाजाचादेखील त्यांना चांगला अनुभव असल्याने विखे यांचे नाव आघाडीवर होते.

विधानसभा अध्यपदासाठी तीन ते चार नाव चर्चेत होती. तथापि, बैठकीनंतर राहुल नार्वेकर यांचे नाव समोर आले. भाजपच्या सर्व आमदारांना दुपारी दोन वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले होते. भाजप कार्यालयात आज जल्लोषाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील इतर नेत्यांसह उपस्थित होते. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या गैरहजेरीमुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. मुंबईतील दादर नायगाव मतदार संघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांचेही नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत होते.

यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाने पत्रक जारी केले असून त्यानुसार 3 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.