उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अर्धवट सोडणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द ; फेरनिविदा प्रक्रिया 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अर्धवट सोडणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द ; फेरनिविदा प्रक्रिया 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश
सोलापूर - 

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अर्धवट ठेवलेल्या पोचमपाड कंपनीचा मक्ता रद्द करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतल्यामुळे या फेरनिविदा प्रक्रियेला सुरुवात झाली. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फेरनिविदा काढण्याची तांत्रिक प्रक्रिया 10 दिवसांत पूर्ण करण्याचा आदेश जीवन प्राधिकरणाला दिला आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी ते सोलापूर अशी 110 किलोमीटरची पाइपलाइन टाकण्याचे काम हैदराबादच्या पोचमपाड कंपनीला ऑगस्ट 2019 मध्ये देण्यात आले होते. या कामाचा ठेका 12 टक्के जादा दराने तब्बल 405 कोटींना दिला होता. आजवर ‘पोचमपाड’ने 12 किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे. उजनी धरणावर जॅकवेल बांधण्याचे कामदेखील सुरू आहे. या कामावर आतापर्यंत 50 ते 60 कोटी खर्च झाले आहेत. मात्र, जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीने स्मार्ट सिटी कंपनीकडे 103 कोटी वाढवून देण्याची मागणी केली होती. ही मागणी फेटाळून संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीला नोटीस देऊन खुलासा घेतला जाणार आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास ठेकेदाराला ‘काळ्या यादी’त टाकण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चअखेर समांतर जलवाहिनीची वाढीव 100 कोटींसह 500 कोटींची फेरनिविदा काढण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

या प्रक्रियेला आता गती देण्याचे काम महापालिका आयुक्तांनी केले आहे. महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन समांतर जलवाहिनी आणि स्मार्ट सिटीच्या कामांबाबत चर्चा केली. यावेळी जीवन प्राधिकरणाला फेरनिविदांची तांत्रिक प्रक्रिया 10 दिवसांत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.