धाराशिव जावईबापूंच्याच बाजूने; सासरवाडीत झळकले दादांचे पोस्टर

धाराशिव जावईबापूंच्याच बाजूने; सासरवाडीत झळकले दादांचे पोस्टर

     धाराशिव , (प्रबोधन न्यूज )   -      धाराशिव राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाराशिव शहरात अभिनंदनचे बॅनर झळकले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेर गाव हे अजित पवारांची सासरवाडी असून माजी मंत्री व सद्या भाजपवासी डॉ. पदमसिंह पाटील हे त्यांचे मेहुणे आहेत. धाराशिव जिल्ह्यावर अजित पवारांचे पहिल्यापासूनच वर्चस्व राहिले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मागे उभा राहतील, असा अंदाज बांधण्यात आला होता.

मात्र आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्याने उघडपणे अजित पवार की शरद पवार याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच आता धाराशिव शहरात अजित पवार यांचे अभिनंदन करणारे पोस्टर झळकले असून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो त्या बॅनरवर लावण्यात आला आहे. हे बॅनर कोणत्या नेत्यांनी लावले आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

राष्ट्रवादीतील बंडानंतर बुधवारी दोन्ही गटांच्या वतीनं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाच्या वतीनं बैठका घेत आमदार आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, यात अजित पवारांची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण, अजित पवार गटाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाल्याचं समोर आलंय.