h3n2 चा महाराष्ट्रात पहिला बळी, नागपूरमध्येही संशयिताचा मृत्यू; धोका वाढला

यापासून बचाव करण्यासाठी कोविड आणि एच3एन2 सारख्याच पद्धती आहेत. त्यासाठी मास्क वापरा, स्वच्छतेची काळजी घ्या, हात स्वच्छ करत राहा.

h3n2 चा महाराष्ट्रात पहिला बळी, नागपूरमध्येही संशयिताचा मृत्यू; धोका वाढला

मुंबई -  अहमदनगरमधील घटनेनं महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा h3n2 विषाणुमुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे नागपूरमध्येही एका h3n2 संशयित ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात h3n2 विषाणूचा प्रसार होत असून, राज्यभरात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये एका तरुणाचा h3n2 चा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. अहमदनगरमधील विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हा विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होता.

23 वर्षीय तरुण मूळचा औरंगाबादचा असून, तो शिक्षणानिमित्त अहमदनगरला होता. मयत तरुण गेल्या आठवड्यात मित्रांसोबत कोकणात फिरायला गेला होता. फिरून आल्यानंतर सदरील तरुणाची तब्येत बिघडली. त्याची टेस्ट करण्यात आल्यानंतर तो कोविड पॉझिटिव्ह निघाला होता.

त्यानंतर त्याला अहमदनगरमधील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. सोमवारी रात्री 10 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत तरुणांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याच्या रक्तात h3n2 विषाणू आढळून आला. मयत तरुणासोबत गेलेले इतर विद्यार्थीही पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरने सांगितलं.

वायरल इन्फेक्शन असलेल्या एच3एन2 या विषाणू ने नागपूर मध्ये आपले पाय पसरायला आता सुरुवात केली आहे. या विषाणूचे रुग्ण शहरभर वाढत असतानाच एका 78 वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे. मात्र, आरोग्य विभागाने डेथ ऑडिट झाल्यावरच या मृत्यूची नोंद करून घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील 78 वर्षीय रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. रुग्णाला क्रॉनिक ऍबस्ट्रक्टिव्ह पलमोनरी डिसीज (सीओपीडी) मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या सहव्याधी होत्या. उपचार सुरू असतानाच 9 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याची केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला देण्यात आली.

नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन यांनी सांगितलं की, या मृत्यूला सध्या तरी संशयित म्हणून पाहिले जात आहे. बुधवारी डेथ ऑडिट समिती समोर हे प्रकरण आल्यावर व त्यांनी मान्यता दिल्यावरच या मृत्यूची एच3एन2 चा मृत्यू म्हणून नोंद होईल, असं ते म्हणाले.

डॉक्टरांनी सांगितले की, इन्फ्लूएंझा व्हायरसचे चार उपप्रकार आहेत. यामध्ये इन्फ्लूएंझा ए, बी, सी आणि डी यांचा समावेश आहे. H3N2 हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार व्हायरस आहे. जो H1N1 पासून उत्परिवर्तन होऊन तयार होतो. तर, इन्फ्लूएंझा बीचा कोणताही उपप्रकार नसल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्याचे स्ट्रेन वेगवेगळे असू शकतात. यामुळे तो गंभीर स्वरूप धारण करत नाही आणि कोणत्याही साथीचा धोकाही त्यापासून संभवत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दिल्लीतील ज्येष्ठ चिकित्सक डॉ. कमलजीत सिंग कैंथ यांनी स्पष्ट केले आहे की, इन्फ्लूएंझा बी हा देखील फ्लू आहे. त्यामुळे सर्दी-खोकला, घसादुखी, सौम्य ताप अशा तक्रारी नागरिकांना येऊ शकतात. या हंगामामध्ये इन्फ्लूएंझा बी चीही प्रकरणं सापडली आहेत. मात्र इन्फ्लूएंझा ए च्या उपप्रकार H3N2 पेक्षा हे कमी सांसर्गिक आहे. इन्फ्लूएंझा बी च्या संसर्गामुळे गंभीर आजार होत नसून त्याचा संसर्गही लवकर होत नाही. त्याचा संसर्ग झाल्यास घाबरण्याची गरज नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

बचाव कसा करायचा

डॉ. सिंग यांनी यापासून बचाव करण्यासाठी कोविड आणि एच3एन2 सारख्याच पद्धती आहेत. त्यासाठी मास्क वापरा, स्वच्छतेची काळजी घ्या, हात स्वच्छ करत राहा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, ही वरील लक्षणे दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.