पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे – चंद्रकांत पाटील

पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे – चंद्रकांत पाटील

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यातील राज्यसभा निवडणूक निकालावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सहावी जागा जिंकून भाजपने यश मिळवल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, सकाळी पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला, असे पवार म्हणाले होते. प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे.

ते पुढे म्हणाले की, संजय राऊतांनी ज्यांची मतं फुटली त्यांची नावं आमच्याकडे असल्याचं म्हटलं होतं. त्यावर पाटील म्हणाले की, इथे त्यांची कार्यपद्धती चुकते. हे सुडाचं राजकारण गेली अडीच वर्षे सुरू आहे. या सरकारला सत्तेत राहून वाटतंय की, याला उचलू, त्याला उचलू. मला कोणाचं समर्थन करायचं नाही, पण महाराष्ट्रात तुमची सत्ता असताना एका साध्या अभिनेत्रीला (केतकी चितळे) या पोलिस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात फिरवलं जातंय, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केवळ एक थोबाडीत लगावली असती या विधानावरून तुरुंगात टाकलं होतं, तर मग काल संजय राऊत यांनी हात तोडून टाकेन अशी भाषा वापरली, मग लावा आता त्यांच्यावर केसेस. सत्तेचा दुरुपयोग तर हेच करत आहेत.

विधान परिषदेतही आम्ही सहा जागा जिंकणार असल्याचंही पाटील म्हणाले. ते म्हणाले की, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही. हे गणित आहे. कारण पाहा मत दाखवून टाकायला लागतं तिथं आम्हाला 11 मते जास्त मिळाली, तर जिथे मत न दाखवता टाकायचं असतं, तिथे काय होईल! 20 तारखेला हा चमत्कार दिसेल असेही पाटील म्हणाले.