नदी संवर्धनासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाव्दारे अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा : डॉ. राजेंद्र सिंह

नदी संवर्धनासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाव्दारे अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा : डॉ. राजेंद्र सिंह
नदी संवर्धनासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाव्दारे अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा : डॉ. राजेंद्र सिंह

पिंपरी-चिंचवड, दि. १८ एप्रिल - विकासाच्या नावाखाली वेगाने वाढलेले औद्योगिकीकरण आणि सदोष धोरणे यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. परिणामी मानवी जीवनच धोक्यात आले आहे. नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजे नद्या, नाले, ओढे प्रदूषित होत आहेत. गोड्यापाण्याचा हा अत्यंत महत्वपूर्ण स्त्रोत जर आटला तर जगात पाण्यासाठी तिसरे महायुध्द होईल. यावर एकच आशेचा किरण आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत अभियंत्यांनी नद्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी आवश्यक असणारी धोरणे राबविण्यासाठी सरकारवर सामाजिक दबाव निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे आयोजित केलेल्या ‘नदीकी पाठशाला’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. सिंग बोलत होते. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, संस्थेच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण विभाग अधिष्ठाता डॉ. जान्हवी इनामदार आदी उपस्थित होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता.      
यावेळी डॉ. राजेंद्र सिंग म्हणाले की, आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये नदीला खूप महत्व होते. नदी ही मानवाची जीवनरेखा आहे. सद्यपरिस्थितीत शहरी भागातली नद्यांमध्ये कारखान्यांचे प्रदूषित पाणी आणि मैलामिश्रीत पाणी पुरेशी प्रक्रिया न करताच सोडले जाते. त्यामुळे नद्यांमधील जीवसृष्टी लोप पावत आहे. त्या नद्यांवर अवलंबून असणा-या इतर छोट्या मोठ्या गावांना प्रदूषित पाण्याचा वापर करावा लागतो. हेच प्रदूषित पाणी शेतीसाठी, सिंचनासाठी वापरल्यामुळे शेत जमिनींचा दर्जा, पोत खालावत आहे. अशा प्रदूषित पाण्यामुळे अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे. आता या जागतिक समस्येवर विज्ञान तंत्रज्ञानाने आणि संशोधनाने उपाय शोधावा लागेल. तरच पुढील पिढ्यांचे जीवन सुखकर होईल असा आशावाद डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केला.