नाशिकमध्ये मशिदीच्या 100 मीटर परिसरात भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यास बंदी

नाशिकमध्ये मशिदीच्या 100 मीटर परिसरात भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यास बंदी

नाशिक, दि. १८ एप्रिल - धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे नाशिकमध्ये बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व धार्मिक स्थळांसाठी हा नियम लागू असणार आहे. 3 मेपर्यंत भोंग्याची परवानगी घेण्याकरिता धार्मिक स्थळांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर परवानगी न घेता लावलेल्या भोंग्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या नियमाबद्दल माहिती दिली.

भोंग्यावरून धार्मिक तसेच राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना राज्यात असा निर्णय घेणारे नाशिक हे पहिले शहर ठरले आहे. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी डेसिबलची मर्यादा व इतर नियमही ठरवून दिले आहेत. त्यानुसारच नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र अनिधनयमाच्या कलम 40 नुसार हा आदेश दिला आहे. त्यानंतर 3 मेपर्यंत धार्मिक स्थळावंर लाऊड स्पीकर लावण्यासाठी रीतसर अर्ज करावा लागणार आहे. हा अतिशय गंभीर निर्णय असून सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

तसेच मशिदीच्या 100 मीटर परिसरात आणि अजानच्या 15 मिनिटे अगोदर भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यावरदेखील नाशिक पोलिसांनी बंदी घातली आहे. सामाजिक सहिष्णुता कायम राहावी, यासाठी हा आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

भोंग्याबाबत जारी केलेल्या नियमावलीचा भंग केल्यास संबंधिताविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही नाशिक पोलिस आयुक्तांनी दिला आहे. अशा आरोपींविरोधात 4 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. याशिवाय आरोपीने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या शिक्षेत कायद्यानुसार आणखी वाढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.