अभिनेता अर्शद वार्सीवर सेबीची मोठी कारवाई

शेअरमधील हेराफेरी प्रकरणी सेबीनं अभिनेता अर्शद वार्सी, त्याची पत्नी व भावासह ३१ जणांवर मोठी कारवाई केली आहे.

अभिनेता अर्शद वार्सीवर सेबीची मोठी कारवाई

मुंबई - साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाइन ब्रॉडकास्ट या दोन कंपन्यांमधील शेअरमध्ये हेराफेरी केल्या प्रकरणी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) अभिनेता अर्शद वार्सी व त्याच्या पत्नीसह ३१ जणांवर मोठी कारवाई केली आहे. सेबीनं त्यांच्यावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. त्यामुळं त्यांना वर्षभर कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करता येणार नाही. अर्शद वार्सीनं मात्र या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मला शेअर बाजाराचं शून्य ज्ञान असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

अर्शद वार्सी, त्याची पत्नी मारिया, भाऊ इक्बाल वार्सी व अन्य ३१ संस्थांनी साधना ब्रॉडकास्टच्या शेअर मूल्य कृत्रिमरित्या फुगवून नंतर हे शेअर विकले. यातून या सर्वांनी सुमारे ४१.९० कोटी रुपयांचा नफा कमावला. अर्शद वार्सी यानं २९ लाख तर त्याच्या पत्नीनं ३८ लाखांचा नफा मिळवला. साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्सची शिफारस करण्यासाठी 'द अॅडव्हायझर' आणि 'मनीवाइज' नावाच्या चॅनेलवरील YouTube व्हिडिओचा वापर करण्यात आला होता, असा ठपका सेबीनं ठेवला आहे. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

साधना ब्रॉडकास्ट या टीव्ही वाहिनीच्या शेअर्सच्या किमतीत हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी सेबीकडं आल्या होत्या. गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केले जात होते. शेअरच्या किंमती वाढल्यावर आरोपी शेअर विकून नफा कमवत होते. सेबीनं मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली. एप्रिल ते जुलै २०२२ या काळात साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्सच्या भावानं मोठी उसळी घेतल्याचं समोर आलं होतं. जुलै २०२२ च्या दुसऱ्या पंधरवड्यात 'द अॅडव्हायझर' आणि 'मनीवाइज' या दोन यूट्यूब चॅनेलवर 'साधना ब्रॉडकास्ट'विषयी खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच ‘साधना’च्या शेअरच्या किंमतीत आणि संख्येत वाढ झाली होती.