ऑस्ट्रेलियाने नोव्हाक जोकोविचचा दुसऱ्यांदा केला व्हिसा रद्द  

ऑस्ट्रेलियाने नोव्हाक जोकोविचचा दुसऱ्यांदा केला व्हिसा रद्द  
नवी दिल्ली -

जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच सध्या चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियन ओपनसाठी मेलबर्नमध्ये आल्यानंतर त्याचा प्रवेश व्हिसा रद्द करण्यात आला होता. यानंतर जोकोविचने कोर्टात धाव घेतली, जिथे तो जिंकला होता. कोर्टवर विजय मिळवूनही या सर्बियन खेळाडूचे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार की नाही हे निश्चित नव्हते. त्यानंतर आता जोकोविचला आणखी एक धक्का बसला आहे. फेडरल सरकारने नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करणे सार्वजनिक हिताचे होते असे व्हिसा रद्द करण्यात आल्यानंतर सांगण्यात आले आहे.

नोव्हाक जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन मंत्र्यांनी जनहितार्थ हे पाऊल उचलले आहे. दुसऱ्यांदा व्हिसा रद्द झाल्याने जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याच्या आशा संपल्या आहेत. ही स्पर्धा ९ जानेवारीपासून सुरू झाली असून ती ३० जानेवारीपर्यंत चालणार आहे. जोकोविचला थेट स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान देण्यात आले होते. त्याला या स्पर्धेत २१वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकार जोकोविचला तत्काळ देशाबाहेर पाठवणार की त्याला येथे राहण्याची संधी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जोकोविच अजूनही ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ शकतो.

जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा गेल्या आठवड्यातील निर्णय सोमवारी फेडरल सर्किट कोर्टात रद्द करण्यात आला, पण फेडरल इमिग्रेशन मंत्री अ‍ॅलेक्स हॉक यांनी जोकोविचला देशात राहण्याची परवानगी आहे की नाही यावर अंतिम निर्णय घेणार होते. ऑस्ट्रेलियन समुदायाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी जोकोविच हा धोका आहे की नाही हे ठरवण्याचे काम हॉक यांच्याकडे सोपवण्यात आले होते. अखेरीस हॉक यांनी शुक्रवारी दुपारी आपला निर्णय दिला. त्यांनी त्यांच्या विवेकाधिकाराचा वापर केला आणि जोकोविचला ताबडतोब हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता आणि या निर्णयाला त्याने न्यायालयात आव्हान दिले होते. जोकोविचने हे प्रकरण जिंकले होते आणि त्याची सर्व कागदपत्रे परत करण्यात आली होती. यानंतर त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आणि त्याला सरळ मुख्य फेरीत स्थान मिळाले होते. पण पुन्हा एकदा त्याचा व्हिसा रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याच्या त्याच्या आशा संपल्या आहेत.