शाळा सुरु करण्याचा एकत्रित निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार - उपमुख्यमंत्री अजित पवार 

शाळा सुरु करण्याचा एकत्रित निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार - उपमुख्यमंत्री अजित पवार 

पुणे -

राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय एवढे दिवस जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर सोपवण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील काही शहरांच्या शाळा सुरु तर काही ठिकाणच्या बंद आहेत. त्यामुळे राज्यभरात विविध पातळ्यांवर मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे आता राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळा संदर्भात सरसकट निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. 

राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भातला अंतिम निर्णय बुधवारी कॅबिनेट बैठकीत घेणार आहे. जिल्ह्यातील यंत्रणांनाही कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत स्थानिक प्रशासनात मतभेद होण्यापेक्षा राज्य स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हा एकत्रित निर्णय राज्यातील सर्वच शाळांसाठी लागू असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 15 डिसेंबर पासून दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लस घेतली नसल्याचे आढळल्यास त्यांना 15 दिवसाला 500 रुपये या प्रमाणे दंड आकारला जाईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, औरंगाबाद लसीकरणात मागे असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.