अभिनेता किरण मानेंना 'या' कारणामुळे काढल्याचं निर्मात्यांचं  स्पष्टीकरण 

अभिनेता किरण मानेंना 'या' कारणामुळे काढल्याचं निर्मात्यांचं  स्पष्टीकरण 
मुंबई -

अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढून टाकल्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक नेते, अभिनेते यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. किरण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडे आपली बाजू मांडली. राजकीय दबावाखाली येऊन मानेंना मालिकेतून काढण्यात आलं असल्याच्या आरोपाचं निर्मात्यांनी मात्र खंडन केलं आहे.

मालिकेच्या निर्मात्या सुझान घई म्हणाल्या, 'माने यांच्या राजकीय भूमिकेचा आणि त्यांना काढून टाकण्याचा काही संबंध नाही. माने यांना काढण्याचा निर्णय हा व्यावसायिक होता. काही व्यावसायिक कारणं होती, त्याबाबत माने यांना माहिती आहे. त्यांना त्याबाबत अनेकदा कल्पना देखील दिली होती. त्यांना अनेकदा सूचना देऊनही त्या कारणांचे समाधान न झाल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.'

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहचलेल्या या मालिकेमध्ये किरण माने हे त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल नेटवर्किंगवर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जातेय.