ऐनवेळी पत्ता कट झाल्याने राहुल कलाटे अपक्ष लढणार ?

ऐनवेळी पत्ता कट झाल्याने राहुल कलाटे अपक्ष लढणार ?

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके कलाटेंचे मन वळविणार ?

चिंचवड (प्रबोधन न्यूज) - भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि भाजप उमेदवार अश्विनी जगताप हे रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी राहुल कलाटे यांचेही नाव चर्चेत होते. पण ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले आहेत. अशातच शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष लढणार असल्याचे विधान केले आहे.

याबाबत त्यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडे उमेदवारी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत मी निकराची झुंज दिली होती. त्यामुळे मतदार मलाच सहानुभूती दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. मात्र, शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा मिळवून भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. अशातच कलाटे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मविआमध्ये नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके हे राहुल कलाटे यांची समजूत काढण्यासाठी चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र राहुल कलाटे यांनी माघार घेऊ नये या मताचे आहेत. सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते ते पाहावे लागेल.