शुभांगी पाटील व सत्यजित तांबे दोघांचाही विजयाचा दावा

शुभांगी पाटील व सत्यजित तांबे दोघांचाही विजयाचा दावा

न्यूज डेस्क (प्रबोधन न्यूज) - गेल्या काही दिवसांपासून शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली होती. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

यासह अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा निकाल आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार आहे. त्यासाठी आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. बॅलेट बॉक्स काढून गठ्ठे केल्यानंतर दुपारी २ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ५ वाजेपर्यंत कल हाती येण्याची शक्यता आहे. पाच विभागांपैकी सर्वाधिक लक्ष हे नाशिक विभागाकडे लागून आहे. मतमोजणीमध्ये उमेदवाराला विजयासाठी ‘मॅजिक फिगर’ गाठण्यास पहिल्या पसंतीची मते न मिळाल्यास बाद फेरीचा आधार घ्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने मतमोजणी व त्यानंतर निकाल जाहीर होण्यास उशीर लागेल.

पाटील म्हणाल्या, ही लढत जनतेची होती. त्यामुळे जनतेचा आणि महिलांचा कौल शुभांगी पाटील यांच्याच बाजूने होता, जनतेने निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे शुभांगी पाटीलच विजयी होणार, असा दावा स्वतः शुभांगी पाटील यांनी केला. शिक्षक, पदवीधर, वकील आणि विद्यार्थ्यांचे मी आमदार नसताना प्रश्न सोडविले होते. त्यामुळे जनतेला विश्वास आहे विजय आपलाच होणार. कोण कुणाचा वारसा सांगत होते; परंतु मी संघर्षाचाच वारसा सांगत होते. त्यामुळे विजय नक्की शुभांगी पाटीलचाच होणार असून फक्त घोषणा बाकी आहेत, असे शुभांगी पाटील म्हणाल्या.

निकालाआधीच पुण्यात लागले विजयाचे फ्लेक्स

निकालापूर्वीच विजयांचे बॅनरबाजीला सुरवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांचा विजय झाल्याचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची पाषाण परिसरात सत्यजीत तांबेंच्या विजयाचे फलक लावले आहेत.

या फलकांची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे. जीत 'सत्या'चीच, आमदार सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन..असा आशय असलेले बॅनर सनी निम्हण यांनी लावले आहे. सनी निम्हण पूर्वी शिवसेनेत होते, ते सध्या भाजपमध्ये आहे, तांबेंच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनीही आपल्या विजयाचा दावा केला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे गणित शेवटच्या क्षणी बिघडल्याने आघाडीला नाशिकच्या जागेची फारशी अपेक्षा नाही.दरम्यान, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे कालपासून अज्ञातस्थळी आहेत. दुपारी 3 वाजता नाशिक येथे मतमोजणी केंद्रावर पोहचणार असल्याची माहिती आहे. तर डॉ. सुधीर तांबे मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत.

सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्याचा आज निकाल आहे. 2 लाख 62 हजार 678 पैकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी हक्क बजावला आहेत. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे. मतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे.पोलीसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.