संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरपूरला प्रस्थान करणार

संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरपूरला प्रस्थान करणार

देहू, दि. 9 मे - देहू संस्थानने आषाढी वारीची घोषणा केली आहे. यानुसार संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचणार असून 10 जुलैला आषाढी एकादशी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची घोषणा रविवारी करण्यात आली. कोरोना ओसरल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही, मात्र परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारक-यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांनंतर पायी सहभागी होता येणार असल्याने वारीसाठी वारकरी उत्सुक आहेत. पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय अशा जयघोषात लाखो वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने जातानाचे मनोहारी दृश्य यंदा भाविकांना पाहता येणार आहे. टाळ, मृदुंग, हरी नामाचा जयघोष अशा भक्तिरसात चिंब झालेले वारकरी आणि त्यांना पाहण्यासाठी लाखो लोकांनी रस्त्याच्या कडेला उभी असलेली गर्दी हे दृश्य आता कोरोनाचे संकट टळल्याने दिसणार आहे.