'माफी माग, नाहीतर जाऊ देणार नाही !', पंजाबच्या शेतकऱ्यांनी कंगना रनौतला अडवले 

'माफी माग, नाहीतर जाऊ देणार नाही !', पंजाबच्या शेतकऱ्यांनी कंगना रनौतला अडवले 

चंदीगड -

सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंजाबमध्ये असताना येथील शेतकऱ्यांनी कंगनाची गाडी अडवली. तिच्या गाडीला शेतकऱ्यांनी चहू बाजूनी घेरले होते. कंगनाची गाडी अडवून तिने माफी मागावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कंगनाला शेतकऱ्यांच्या गराड्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

कंगना रनौत कारमधून पंजाबमधील चंदीगड-उणा महामार्गावरुन प्रवास करत होती. यावेळी येथील शेतकऱ्यांनी तिची कार थांबवत तिला घेरले. तसेच जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला. मात्र रस्त्यावर रहदारी वाढल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत कंगनाला संरक्षण दिले. तसेच तिची कार शेतकऱ्यांच्या गराड्यातून मुक्त केली.
हा सर्व प्रकार घडत असताना कंगना रनौतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले. 'मी जेव्हा पंजाबमध्ये आले तेव्हा काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला. आम्ही शेतकरी असल्याचे ते सांगत आहेत,' असे कंगनाने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे. तसेच पंजाब पोलीस वेळेवर आले नसते तर आज मॉब लिंचिंगची मी शिकार झाले असते, असेदेखील कंगनाने म्हटले.