रसाळी म्हणजे काय हो भाऊ ?

रसाळी म्हणजे काय हो भाऊ ?

बऱ्याच जणांना "रसाळी" हा शब्द माहीत नसेल. आंब्याच्या दिवसात सर्वांनी एकत्र येऊन आमरसाचे जेवण करणे म्हणजे रसाळी, सोबत कुरडया, पापड्या आणि अनेक पदार्थ हसत हसत आनंदी वातावरणात अक्षरशः हादडणे आणि दुपारी ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजे निवांत झोपणे..... आहाहाहा... सुख रे सुख!

अर्थात कॅलरी आणि वजनाचा फारसा विचार मनात न आणता हं. पण एवढंच नाही. खरी मेख पुढे आहे.

त्या तयार केलेल्या आमरसात आंब्याची एखादी 'कोय' मुद्दाम ठेवली जायची आणि आमरस आग्रहाने वाढताना ज्याच्या वाटीत ती 'कोय' येईल, त्याच्यावर "रसाळी" लागली असे म्हणायचे . म्हणजे पुढचे आमरसाचे जेवण त्याने द्यायचे.

अशी आमरसाच्या गोडीची गोड शृंखला..

काका, मामा,मावशी, आत्या,त्यांची मुलं, वडीलांचे मित्र, स्नेही, शेजारी यांच्याकडे अशी उन्हाळा संपेपर्यंत रसाची जेवणं अगदी थाटामाटात व्हायची.

खाणं हा मुख्य उद्देश असला तरीही एकमेकांकडे आपुलकीने जाणं व्हायचं..सुख दुःख सहज सांगितली जायची. मदत मिळायची. विचारांची देवाण घेवाण असायची..

आंब्याचे कितीतरी प्रकार मिळतात. हापूस हे जरा श्रीमंतांच लेकरू आणि फळ..पण लंगडा, तोतापुरी, शेप्या, केशर, गोट्या, खोबऱ्या, हरण्या, लालबाग, बदाम, अशा कित्येक प्रकारचे नवनवीन आंबे बाजारातून आणणे हा एक सोहळाच असायचा.

प्रत्येक आंब्याची वेगळी खासियत.

कुणी इतका गोड जणू साखरच..

कुणाची कोय आंबट पण बाकी गोड..

कुणी दिसायला हिरवा पण आतून रसदार..

काही आंबे सुरकुतलेले पण चव अप्रतिम..

जणू काही प्रेमळ जेष्ठ असतात तसे..

काही इतके देखणे पण चव मात्र अगदीच सामान्य..असो......

आंबा विकणारे बाया बापडे भाऊ 'बघा की चव' म्हणून हातावर टोपलीतील एका आंब्याचा रस तिर्थाप्रमाणे देणार. आता प्रत्येक वेळी दाखवलेला आंबा आणि आपल्या गळ्यात पडणारा आंबा सारखाच गोड निघाला तर योगायोग समजायचा. आंबा पटला की मग भाव करणे आले. काही ठिकाणी डझन.. किंवा सोळा किंवा शेकड्यानं भाव होतात. मग निवडून आंबे मोठया पिशवीत किंवा गोणीत टाकायचे. हक्काने एखादा आंबा जास्त मिळायचा बरं का.. केवढं गणगोत विकणाऱ्याचं आणि ग्राहकाचं..

आमचे आप्पा काका छान पारख करायचे आंब्याची. शक्यतो त्यांनी आणलेला आंबा फसायचा नाही. याचंही आम्हांस खूप अप्रूप वाटे. घरी येईपर्यंत त्या आंब्याचा  घमघमीत सुवास आणि त्या पिशव्या याशिवाय दुसरा विचारच नसायचा.

आता रस करतांना कमीत कमी दोघंजण तरी कामाला लागायचे. पोरांची लुडबुड असायची आणि एखादा रपटा बसला की सगळी पोरं दूर पळायची..

आंबे पाण्यात बुडवणे,

स्वच्छ धुणे,

पुसून कोरडे करणे,

हलक्या हाताने माचणे (म्हणजे एका हाताचा अंगठा देठावर हलका धरून दुसऱ्या हाताने आंबा दाबत दाबत गोल फिरवायचा म्हणजे कोय मोकळी होते) नाहीतर रसाच कारंज उडायचं,

मग एखादी तिजोरी उघडावी तसं देठाचा काळा डॉट काढून केशरी पिवळा रस स्वच्छ पातेल्यात जमायचा... जणू अमृत..

मग कोयी हाताने निपटून साफ करायच्या.

साली साफ करायच्या. काही जण थोड्याशा पाण्यात साली कोयी कोळून घ्यायचे अगदी पचपच असा आवाज येतो हे करतांना. तो ही एन्जॉय करायचा. मग गोडीनुसार साखर पेरणी व्हायची. बाकी काही नको. मग रस पळीने ढवळणे किंवा रवीने रसाच्या गाठी मोकळ्या करणे. आता हॅन्ड मिक्सिने हे काम मिनिटात होते. एवढा पुरेल का अशी कुणी शंका काढली तर 'अरे आहेत वेगळे ठेवलेले आंबे डझनभर' अशी गुपितं मोकळी व्हायची.

तिकडे आई मावशी माम्या कुणी पोळ्या..

कुणी भाजी.... तसा तीचा आज काही उपयोग नसायचाच..

कुणी वडे, भजी..

कुणी कैरीची चटणी किंवा तक्कू..

तर कुणी भुरका वगैरे असं काय काय करायच्या.

बारा साडेबारा झाले की कुरडया पापड्यांचा पांढरा स्वच्छ ढिग फुगून तयार असायचा. ताटं, पाटं, लोटीभांडं घेतली जायची. भरलं ताट अस्सं सजायचं की ते बघूनच तोंडाला पाणी सुटायचं.... आधी ते ताट देवासमोर जायचं..... नैवेद्य, आरती झाली की मग "रसाळीची" पंगत सुरु..

आग्रह तर विचारूच नका.

नाक बुडेपर्यंत रस खाणं.. वाढणं.. आणि पचवणं अपेक्षित असायचं.

कुणी क्वचित रसाच्या वाटीत साजूक तूप मागे की कुणी वेलची पावडर मागे..... पण खरं म्हणजे रसात काहीच नको रस म्हणजे फक्त रसच हे माझं समीकरण आहे. खरंच आंबा हा राजाच.... मग त्याच्या सोबत काहीच नको असायच.. तो एकटाच दिमखात भाव खातो..

चार पाच वाट्या रस प्रत्येकजण सहज रिचावायचे.... मग पुन्हा एकदा आग्रह... पोळ्याच्या पराती रिकाम्या होऊ न देता झटपट गरम गरम पोळ्या वाढल्या जायच्या. त्या दिवशी भाजी.. आमटी भात याकडे थोडं दुर्लक्ष करायचं..

फक्त रस आणि पोळी.. येऊ दे!

कुरडया, पापड्या, भजी एवढीच मुशाफिरी करायची..

एकदा पंगत बसली की मग कुणाला "रसाळी" लावायची याची खलबतं वाढणाऱ्या मंडळीत ठरायची.. आणि बरोबर त्याच्या वाटीत आमरसातील कोय जायची आणि त्याला "रसाळी" लागायची.. पंगतीत एकच हशा पिकायचा..

एवढी गंमत आणि निखळ आनंद मिळायचा की सुख म्हणजे काय असतं याचं उत्तर सापडायचं.

पुढच्या पंगतीला सर्व काही आहे की नाही याची खात्री व्हायची.. शक्यतो काही कमी नसायचंच..

रस संपत आला की पुन्हा पुरुषांपैकी कुणीतरी आंब्याचा रस करायचा.. स्वयंपाक घरात राबणाऱ्या हातांचा आणि मनाचा तो सन्मान असायचा..

आया बाया जेवताना काही सिक्रेट रेसिपीज् एकमेकींना सांगायच्या.. हसत खेळत आनंदाने चार घास जास्तीचे घ्यायच्या..

कुण्या दुरावलेल्याच्या आठवणीत डोळे सहज ओले व्हायचे...

एव्हाना मोठी मंडळी वामकुक्षीच्या तयारीत..

पोरं काहीतरी पत्ते वगैरे खेळायला तयार..

रसाळीच जेवण जेवलेला प्रत्येक जीव घटकाभर तरी झोपायचाच.

त्या दिवशी संध्याकाळी तशी कुणालाच जास्त भूक नसायची. मग साधी तूप खिचडी किंवा गरमागरम थालीपीठ खाल्लं की रात्री गच्चीवर पत्ते.. कॅरम.. गाण्यांच्या भेंड्याचे फड रंगायचे.. रेडिओ लावायचा.. आणि तारे मोजत थंड हवेत आकाश पांघरून मस्त झोपायचं.. सकाळी साक्षात सूर्य नारायणच यायचे आम्हाला उठवायला..

असो ..तर अशी ही रसाळीची गंमत..

छपरावर साली कोया वाळवायच्या..

त्या पावसाळ्यात पाणी गरम करायच्या बंबात वापरायच्या. वाळलेल्या कोयी फोडून त्यातला खोबऱ्यासदृश भाग भाजून साल काढून मीठ लावून खाणं म्हणजे रसाळीचं सर्कल पूर्ण करणं..

आज हापूसची दुसरी पेटी घरी आलीये.. रस केलाय..

आणि आठवलं सारं..

"कुरडया पापड मायक्रोवेव्ह मधून काढ बाबा आता... झालंय माझं रसाचं काम.. जरा ताटं घेतोस का आणि रसाच्या वाट्या पण भरून घे बरं." आतून आदेश आला.....

हो आलोच..... डोळ्यात रसाळीची पंगत साठवत......

आम्ही आत वळलो.....

(प्रसाद उनवणे यांच्या वॉलवरून)