बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मानित 

बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मानित 
नवी दिल्ली -
बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो ठरलेल्या अभिनंदन वर्धमान यांना आज वीर चक्र पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीर चक्रने सन्मानित केले. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 ला एक पाकिस्तानी F-16 लढावू विमान पाडलं होतं. त्यानंतर ते तीन दिवस पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताने पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. त्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवलं होतं. त्यानंतर अभिनंदन यांच्या शौर्याचा सन्मान करत भारतीय वायूसेनेनं त्यांना ग्रुप कॅप्टनची रँक दिली होती. हे पद भारतीय लष्करात कर्नल रँकच्या बरोबरीचं आहे. 

पुलवामात 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये शहीद झालेल्या 40 जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारताने 26-27 फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानात एअर स्ट्राईक केलं होतं. बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक दरम्यान अनेक दहशतवादी मारले गेले होते. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्टाईकला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडूनही भारतीय बॉर्डरवर आपलं विमान पाठवले होते. मात्र, अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं. यावेळी अभिनंदन यांच्या विमानालाही अपघात झाला आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्यानं अभिनंदन यांना ताब्यात घेतलं. होतं. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरुन पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण केला. त्यामुळे तीन दिवस पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात राहिलेल्या अभिनंदन यांना भारताकडे सोपवणं पाकिस्तानला भाग पडलं होतं.