लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा व कोपरा सभा घेण्याकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ ठिकाणे निश्चित

लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा व कोपरा सभा घेण्याकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ ठिकाणे निश्चित

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा व कोपरा सभा घेण्याकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाहीत. निश्चित केलेल्या जागेवर सभा घेण्यासाठी पक्षांना किंवा उमेदवारांना क्षेत्रीय कार्यालयांकडे अर्ज करावा लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो. या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जाहीर सभा व कोपरा सभा घेण्यासाठी महापालिकेने मैदान व मोकळ्या जागा निश्चित केल्या आहेत. त्या जागेत सभा घेता येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे. पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यामागील मोकळी जागा, आकुर्डीतील खंडोबा मंदिराशेजारील जागा, प्राधिकरणातील संजय काळे क्रीडांगण, नियोजित महापौर निवासस्थानाची मोकळी जागा, मदनलाल धिंग्रा मैदान, शाहूनगर येथील राजर्षी शाहू महाराज मैदान अशी ठिकाणे आहेत. मोरया गोसावी मंदिराशेजारील मैदान यासह भोसरीतील पीएमटी चौक, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील चौक, चऱ्होली बैलगाडा घाट, मोशीतील शिवाजी महाराज पुतळा चौक, दिघी जुना जकातनाका चौक, डुडुळगाव, बोपखेल गावठाण, भोसरीतील तळ्याजवळील मैदान, पिंपळे गुरव येथील मोकळी जागा, सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान ही ठिकाणे सभेसाठी निश्चित करण्यात आली आहेत.