सावधान ! दाऊद टोळी सक्रीय झालीय

सावधान ! दाऊद टोळी सक्रीय झालीय

(रोहित आठवले)

राज्यात पुन्हा एकदा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करू पाहत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून, दाऊदशी संबंधित घटना यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये घडली होती. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड बाबत तेवढ्याच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यावर नुकत्याच झालेल्या सिक्युरिटी_रिव्ह्यू मीटिंगमध्ये पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये काही तरी वेगळं सुरू असल्याचं निदर्शनास आले असून, त्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. पण आयुक्तालयात चार वर्षानंतरही "एटीसी"चे काम सुरू झालेले नाही तर पुण्यातील "पीएटीसी"चे काम थंडावले आहे. पूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बोलाविले आहे असे म्हणले तरी अनेकांना भीती असायची.. पण सध्या गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घर ते ऑफिस असा स्वतःचा प्रवास करण्यासाठी गुगल मॅप ची गरज भासत असल्याने सगळा कारभार रामभरोसे सुरू आहे.

दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी १७ वर्षांपूर्वी ऑगस्ट २००५ मध्ये पिंपरी चौकातून २२ वर्षीय सागर साहनी याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या घटनेत आरोपी असलेल्यांपैकी दोन आरोपींचा दाऊदशी संबंध उघड झाले होते. एक आरोपी १९९२ पासून दाऊद बरोबर पाकिस्तान आणि दुबईत वास्तव्याला होता. तर एक कालांतराने त्याच्या संपर्कात आला होता.

दाऊदशी १९९२ पासून संबंधित असलेला आणि परदेशात असलेला आफताब आलम मोहम्मद आयुब उर्फ विक्की आणि अबिद अली या दोघांचा सागर साहनी अपहरण खून प्रकरणात परदेशातून सहभाग असल्याने त्याच्यासह अन्य काही आरोपींबाबत रेड_कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर विक्की हा मलेशियात जाऊन लपल्याची माहिती तपास यंत्रणांना कालांतराने मिळाली होती.

साहनी प्रकरणापूर्वी पुण्यातील एका बिल्डरवर भवानी पेठेत खंडणीसाठी गोळीबार झाला होता. या गोळीबारासह देशभरात १९ गुन्हे या टोळीवर दाखल होते. त्यामुळे तत्कालीन गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. साहनी प्रकरणातील टोळी आता ॲक्टीव्ह नाही असे पण सांगितले जाते. मात्र, विक्की अजूनही मलेशियात असल्याने आणि तो दाऊदसाठी काम करीत असल्याचा संशय आजही कायम आहे.

नांदेडमध्ये नुकतीच संजय_बियाणी या प्रतिथयश व्यावसायिकाची अवघ्या ४० सेकंदात हत्या करण्यात आल्याच्या घटनेने देशभर खळबळ उडलीय. तर खलिस्तानवादी चार दहशतवादी पकडल्यावर त्यांचे नांदेड कनेक्शन उघड झाले असून, यातील काही आरोपींनी बियाणी यांच्या हत्येनंतर अनेक व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन केल्याचेही आता समोर येत आहे.

या घटना ताज्या असतानाच शहराचा प्रमुख चौक म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चौकातून सागर याचे अपहरण आणि हत्येच्या घटनेची आठवण आजही तेवढीच ताजी आहे. पिंपरी-चिंचवड मधील अनेक बांधकाम व्यावसायिकांना यापूर्वी दाऊद, छोटा राजन, छोटा शकील, शेट्टी आणि अन्य काही कुख्यात लोकांच्या नावाने खंडणीसाठी फोन येऊन गेले आहेत. अनेकांनी वेळोवेळी ही खंडणीची रक्कम पुण्यातील गुटखा व्यवसायिकामार्फत हवाला द्वारे ही रक्कम परदेशात पाठवल्याचे जुने अधिकारी सांगतात.

दहशतवादी कारवाया आणि पुणे जिल्हा असा विचार करताना एटीएसच्या (राज्य दहशतवाद विरोधी पथक) धर्तीवर पुण्यात स्पेशल ऑपरेशन विंग सुरू झाले होते. कालांतराने राज्यभर हे विंग स्थानिक पोलिसांच्या अखत्यारीत सुरू करण्यासाठी त्याची पूनर्ररचना करताना त्याचे नामांतर एटीसी (दहशतवाद विरोधी सेल)

तर पुण्यात पीएटीसी असे झाले. या नामांतरानंतर राज्यात सर्वत्र एटीसी गुन्हेशाखेच्या अंतर्गत काम करत आहे. पण पुण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या अती उच्चपस्थ अधिकाऱ्यांनी गुन्हेशाखेच्या अंतर्गत असलेले पीएटीसी हे  "स्पेशल ब्रांच"ला जोडले आणि त्याचे काम थंडावले असे अनेक अधिकारी सांगतात.

दाऊद पुन्हा ॲक्टीव्ह झाल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून टीव्हीवर झळकत आहेत. NIA ने हा संशय व्यक्त केला आहे. त्यावर राजकीय आरोपही होत आहेत. पण सामाजिक शांतता राखण्यासाठी महाराष्टातील संपूर्ण पोलिस दल सक्षमपणे काम करीत असल्याचे मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहे.

मात्र राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न दाऊद आणि त्याच्याशी संबंधित लोक करू शकतात असा संशय जर केंद्रीय तपास यंत्रणांनी उपस्थित केला असेल तर कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणून मोठ्या होणाऱ्या पुणे, पिंपरीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्ब स्फोट, हैदराबाद बॉम्ब स्फोट, गुजरात बॉम्ब स्फोट, मुंबई साखळी स्फोटातील आरोपींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पिंपरी-चिंचवडचा यापूर्वी उघड झालेला संबंध विसरून चालणार नाही. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुणे "एटीएस"ला रिक्त जागेवर अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे एटीएसला मदत होईल या स्वरूपाने "एटीसी"ने काम करण्याची गरज आहे.