पिंपरी-चिंचवडसाठी होणार स्वतंत्र पोस्ट मुख्यालय!भाजपा आमदार महेश लांडगे यांची मागणी - केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन

पिंपरी-चिंचवडसाठी होणार स्वतंत्र पोस्ट मुख्यालय!भाजपा आमदार महेश लांडगे यांची मागणी - केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन

        पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  - स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या धर्तीवर आता पिंपरी-चिंचवड पोस्ट मुख्यालय निर्मिती करावी. ज्यामुळे शहर आणि परिसरातील पोस्ट ग्राहकांना सेवेचा लाभ घेता येईल आणि कामकाजात सुसूत्रता येईल, अशी मागणी भाजपा आमदार तथा शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुणे विभागीय पोस्ट कार्यालयाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे. मुख्य कार्यालयातूनच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम, पूर्व आणि ग्रामीण भागाचा कामकाज सुरू आहे. यामुळे पुणे जिल्ह्याची लोकसंख्या दोन कोटींच्या जवळपास आहे. पोस्ट ऑफीसच्या कामकाजाचे नियंत्रण पुण्यातील मुख्यालयाच्या माध्यमातून केले जाते.

वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहर ही ‘मेट्रो सिटी’ म्हणून नावारुपाला येत आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय कामकाजातील सूसुत्रता यासाठी जिल्हा विभाजन धोरणानुसार, पुणे व पिंपरी-चिंचवड (शिवनेरी) असे दोन जिल्हे स्वतंत्र व्हावेत, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे विचारधीन आहे.

२०१८ मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाचे विभाजन करुन पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यात आले. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडसाठी भारतीय डाक विभागाचे स्वतंत्र विभागीय कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.


केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून दि. २४ जून २०२१ रोजी सर्व विभागीय डाक कार्यालयांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये विभागीय पोस्ट आणि कार्यालयाचे विभाजन याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुसरून पुणे विभागीय पोस्ट मुख्यालयाचे विभाजन करुन पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र पोस्ट मुख्यालय निर्माण करावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे. याबाबत नवी दिल्ली येथे लवकरच मंत्रीमहोदय यांची भेट घेणार आहे.
- महेश लांडगे, आमदार तथा शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख, भाजपा.