राज्यात ‘जेएन१’चा संसर्ग वाढतोय; सर्वाधिक रुग्ण पुण्यात

राज्यात ‘जेएन१’चा संसर्ग वाढतोय; सर्वाधिक रुग्ण पुण्यात

पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  पुणेकरांनो, कोरोनाच्या ‘जेएन१’ या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, प्रतिबंधात्मक काळजी मात्र नक्की घ्या. गर्दीमध्ये जाऊ नका, मास्कचा वापर करा आणि सामाजिक अंतराचे भान राखा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा ‘जेएन१’ हा उपप्रकार आहे. त्याने ‘एक्सबीबी’या व्हेरिएंटची जागा घेतली आहे. त्यामुळे हा नवीन व्हेरिएंट राज्यात सर्वत्र पसरत असल्याचे दिसते. मात्र, हा व्हेरिएंट सौम्य आहे. त्याच्या संसर्गातून रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली तरीही रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे.

राज्यात ‘जेएन १’ विषाणूच्या २५० रुग्णांचे निदान झाले. यापैकी सर्वाधिक १५० रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत, असा बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात केलेल्या जनुकीय क्रमनिर्धारणातून हा निष्कर्ष निघाला आहे, असे ‘जीनोम सिक्वेन्स्ािंग’चे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

डॉ. कार्यकर्ते म्हणाले, ‘‘या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या जनुकीय क्रमनिर्धारणात ‘जेएन१’चा संसर्ग वाढल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्यक्ष रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.’’