ग्रीसमध्ये दोन ट्रेनची धडक, 29 प्रवाशांचा मृत्यू, 85 जखमी

मध्य ग्रीसमधील लॅरिसा शहराजवळ पॅसेंजर ट्रेन आणि मालवाहू ट्रेनमध्ये टक्कर झाली. गाड्यांची टक्कर इतकी वेगवान होती की जणू काही स्फोटच झाला.

ग्रीसमध्ये दोन ट्रेनची धडक, 29 प्रवाशांचा मृत्यू, 85 जखमी

नवी दिल्ली - ग्रीसमध्ये मंगळवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला आहे. येथे पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 85 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बहुतांश जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, मध्य ग्रीसमधील लॅरिसा शहराजवळ पॅसेंजर ट्रेन आणि मालवाहू ट्रेनमध्ये टक्कर झाली. गाड्यांची टक्कर इतकी वेगवान होती की जणू काही स्फोटच झाला. परिसरात भूकंपसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

पॅसेंजर ट्रेनमध्ये 350 हून अधिक प्रवासी होते. या भीषण अपघातातील 250 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. हा अपघात नेमका कोणाच्या चुकांमुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहितीनुसार, मंगळवारी एक पॅसेंजर ट्रेन अथेन्सहून थेसालोनिकीकडे जात होती. मालगाडी थेस्सालोनिकीहून लॅरिसाला जात होती. ही धडक इतकी जोरदार होती की पॅसेंजर ट्रेनचे पहिले 4 डबे रुळावरून घसरले. तर 2 डबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. धडकेनंतर ट्रेनला आग लागली.

मोठा स्फोट झाल्यामुळे ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना काही समजू शकले नाही. ट्रेनचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. थेस्लीचे गव्हर्नर कोन्स्टँटिनोस यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर मलबा सर्वत्र पसरला, त्यामुळे बचावकार्य कठीण आहे. तुटलेले डबे आणि मलबा उचलण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्या आहेत.