अरविंद एज्युकेशन सोसायटीत महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी केली 'थुंकी मुक्त अभियाना'ची जनजागृती

      पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -  जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शाळा व शाळेच्या परिसराची स्वच्छता केली. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी  'थुंकी मुक्त रस्ता अभियाना'ची जनजागृती केली.
         राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, लिटिल फ्लॉवर प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
          यावेळी विद्यार्थ्यांनी 'स्वच्छ शहर, आनंदी शहर', 'गांधीजी का एकच नारा', 'स्वच्छ भारत देश हमारा', 'थुंकू नका खाऊन पान, समाजात कमी होईल सन्मान' अशा घोषणा दिल्या. शिक्षिका कीर्ती शिंपी, सुजाता गोरे, संजीवनी बडे, ज्योती फर्टीयाल यांनी गांधीजींच्या कार्याविषयीची माहिती दिली. शिक्षिका देबजानी मुजुमदार व विद्यार्थ्यांनी बंगाली गीत 'एकला चलो रे' सादर केले. तसेच बापू की बेटीया गीतावर नृत्य सादर केले. विद्यार्थिनींनी 'साबरमती के संत' हे गीत सादर केले.
            संस्थेच्या नाटक विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषण टाळा पर्यावरण सांभाळा, हे पथनाट्य सादर केले. फक्त पर्यावरण सांभाळा, एवढेच नाही तर या पथनाट्यातून 'थुंकी मुक्त रस्ता' या संस्थेच्या अभियानाचा जागरही करण्यात आला. विद्यार्थ्यांनी 'काका रस्त्यावर थुंकू नका', त्याचबरोबर यापुढे रस्त्यावर कुणालाही थुंकू देणार नाही, अशी शपथ घेतली. विद्यार्थ्यांकडून शाळेत स्वच्छता अभियानही राबविण्यात आले.
           शिक्षिका दीपा गायकवाड व स्वाती गाडे यांनी  कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन अथर्व पाचर्णे व अंकुर पांचाळ यांनी, तर शिक्षिका सोनाली आवळे व प्रिती पाटील यांनी आभार मानले.