राष्ट्रवादी' पुन्हा? एकत्र येण्याचे धुमारे, सुटले समेटाचे वारे!

राष्ट्रवादी' पुन्हा? एकत्र येण्याचे धुमारे, सुटले समेटाचे वारे!

  मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट होऊन अजून महिनाही उलटला नाही. तोच दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2 जुलै रोजी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार सरकारमध्ये सहभागी झाले आणि थेट कॅबिनेट मंत्री झाले. अजित पवार तर उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार आणि शरद पवार गटानं वेगवेगळी राजकीय वाट धरली. अजित पवारांच्या गटानं महायुतीत तर शरद पवारांच्या गटानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकारणाला सुरूवात केली. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात तब्बल 24 वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट झाली. नेमका कोणत्या गटाचा झेंडा हाती घ्यावा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. पण आता कार्यकर्त्यांसमोरचा तिढा सुटणार आहे. आगामी काळात दोन गट एकत्र येण्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, असं सूचक वक्तव्य सुनील तटकरेंनी केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या प्रश्नाची उत्तरं काळाच्या ओघात मिळतील, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. तर शरद पवार गटाकडूनही या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं. ‘सर्वप्रथम सोडून ते गेले होते, त्यांनीच गट बनवला. तटकरे जे सांगत आहेत, त्याचं उत्तर त्यांनाच माहिती असेल. पक्ष बळकट करण्यासाठी शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्त क्लाईड क्रास्टो यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली नाही. जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंची भेट घेतली होती, त्या भेटीत दोन्ही नेत्यांनी हास्य विनोद केल्याची दृश्य सर्वांनी पाहिली होती. एकंदरीतच दोन्ही गटांनी राजकारणातली कटुता वैयक्तिक संबंधांमध्ये आणली नाही. त्यामुळे आगामी काळात दोन्ही गटांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन ‘राष्ट्रवादी पुन्हा’ असा पुकारा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.