राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभर आंदोलन

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभर आंदोलन

नवी दिल्ली/बंगळुरू/जयपूर – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा आणि त्यानंतर रद्द केलेले संसद सदस्यत्व यामुळे विरोधकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली असून, देशभरात जागोजागी निदर्शने सुरू झाली आहेत.

विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीतील विजय चौकात निदर्शने सुरू केली आहेत. पोलिसांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात या खासदारांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीत इतरत्र आंदोलनाचे लोण पसरू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एखाद्या लष्करी छावणीसारखे चित्र जागोजागी दिसत आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पोलिसांनी शिवकुमार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमामात धरपकड करण्यात आली. देशाच्या विविध भागांत काँग्रेसने आंदोलन सुरू केले असल्याचे वृत्त हाती येत असून, हे आंदोलन वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत.

जयपूरमध्ये राजस्थान काँग्रेसने आंदोलन केले. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. जनता सरकारच्या काळात कै. इंदिरा गांधी यांना अटक झाल्यानंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती तशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची भावना काँग्रेसच्या नेत्याने व्यक्त केली.