धर्मांध शक्तींना नाकारून जातीय सलोखा वाढवण्यासाठी युवकांनी पुढे यावे : प्रतिमा मुदगल

धर्मांध शक्तींना नाकारून जातीय सलोखा वाढवण्यासाठी युवकांनी पुढे यावे : प्रतिमा मुदगल

भारत जोडो यात्रेत युवकांचा लक्षणीय सहभाग : शिवराज मोरे

पिंपरी, - मागील सात वर्षात देशामध्ये धर्मांध शक्ती वेगाने वाढत आहे त्याला नाकारून सर्वधर्मसमभावाचे काँग्रेसचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी युवकांनी एकजुटीने पुढे यावे असे आवाहन युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिमा मुदगल यांनी केले.

      सोमवारी (दि.२६) ताथवडे येथे पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रतिमा मुदगल यांनी युवकांशी संवाद साधला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश महासचिव अनिकेत नवले, जिल्हा प्रभारी उमेश पवार, प्रदेश सचिव अनिकेत अरकडे, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, करन गिल, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, सौरभ शिंदे, विनिता तिवारी, अपूर्वा इंगोले, गौरव चौधरी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, रोहित भाट, मिलिंद बनसोडे, गणेश शितोळे, विक्रांत सानप, मयूर रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रतिमा मुदगल म्हणाल्या की, मागील सात वर्षात केंद्रातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराला पाठीशी घालत भांडवलदारांना पूरक ठरतील अशी ध्येय धोरणे राबवली, त्यामुळे नवीन रोजगार निर्माण झाला नाही, तर बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली त्याचा सर्वात जास्त त्रास युवकांना होत आहे. देशाची युवाशक्ती ही देशाचे भविष्य आहे. या युवाशक्तीला बेरोजगारी बरोबरच महिला, युवतींवरील वाढणाऱ्या अन्याय अत्याचाराचा देखील सामना करावा लागत आहे. या भ्रष्टाचारी सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी "भारत जोडो यात्रा" सुरू केली आहे. यामुळे देशभर युवकांमध्ये नवचैतन्याची लाट पसरली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचवावा.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले की, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून देशभरातील युवकांशी, नागरिकांशी संवाद साधला जात आहे. ही यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी येणार आहे. या यात्रेत युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच युवक काँग्रेसच्या वतीने "माझा गाव, माझी शाखा" हे अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर तसेच शहरी भागातील प्रत्येक वार्डमध्ये युवक काँग्रेसची शाखा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यातून युवकांचे संघटन उभे राहील, तसेच काँग्रेसची ध्येय धोरणे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवली जातील.

स्वागत विनिता तिवारी, प्रास्ताविक कौस्तूभ नवले, आभार विशाल कसबे यांनी मानले.