राजशिष्टाचाराचे पालन न झाल्यास मेट्रो उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करणार – संजोग वाघेरे

राजशिष्टाचाराचे पालन न झाल्यास मेट्रो उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करणार – संजोग वाघेरे

पिंपरी-चिंचवड, दि. 5 मार्च – उद्या (रविवार, दि. 6) पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी मोदी पुण्यात येणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण असणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेने राजशिष्टाचार पाळला जात आहे की नाही हे पाहावे. जर भाजपने श्रेय लाटण्याच्या नादात पालकमंत्र्यांना बोलावले नाही तर नाईलाजाने राष्ट्रवादीला कार्यक्रमास विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागेल. मात्र अजित पवार यांनी उद्घाटनास विरोध न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

माजी महापौर संजोग वाघेरे पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी सत्ता दिल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पाच वर्षे शहराकडे दुर्लक्ष केले. शहराच्या विकास कामांसाठी आणि शहरवासियांसाठी त्यांच्या नेत्यांना शहराची वाट दिसली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांना शहरात बोलावून दिखावा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते पुण्यात येणार आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये बोलावून कामाचे उद्घाटन करून श्रेय लाटण्याची तयारी सुरू आहे.

यापूर्वीही महापालिकेच्या प्रशासकीय कार्यक्रमांमध्ये राजशिष्टाचाराचे पालन झालेले नाही. त्यामुळे आयुक्तांनी पालकमंत्र्यांचा अनादर होणार नाही याची खबरदारी महापालिका प्रशासन व आयुक्त राजेश पाटील यांनी घ्यावी. तसे न झाल्यास पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला या कार्यक्रमाला विरोध करावा लागेल.