राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांनी दिले 'हे' उत्तर !

राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांनी दिले 'हे' उत्तर !
पुणे -

भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश-गोव्यासह देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावरून टीका केली. फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष असे म्हणतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशीही टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, 'महाराष्ट्रापुरतं जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचं उत्तर सडेतोडपणे देईल. देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल. फडणवीसांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे हे लोक उत्तर देतील. शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचं देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोललं पाहिजे, तारतम्य पाळलं पाहिजे,' असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.