महानगरपालिका हद्दीतील वाणिज्य आस्थापनांचे फायर ऑडीट करा  - स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांची मागणी

महानगरपालिका हद्दीतील वाणिज्य आस्थापनांचे फायर ऑडीट करा  - स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांची मागणी
पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  - चिखली, पुर्णानगर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व वाणिज्य आस्थापनांचे फायर ऑडीट करा, अशी आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
       आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सावळे म्हणतात, बुधवारी म्हणजे काल (दि. ३०) पूर्णानगर येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली होती. सचिन हार्डवेअर नावाच्या दुकामधील लाकडी पोटमाळ्यावर (मेझानाइन फ्लोअर) चौधरी कुटुंब राहत होते. त्यामुळे दुकानातूनच घरात वर जाण्यासाठी जिना होता. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दुकानातील सामानाला अचानक आग लागली. दुकानात पेंटिंगचे डबे असल्याने आगीने तीव्र रूप धारण केले. जीव वाचविण्यासाठी चौधरी व त्यांच्या मुलांनी आरडाओरडा केला. खाली दुकानात आग लागल्याने त्यांना बाहेर जाण्यास रस्ता नव्हता. दुकानाला आग लागल्यानंतर चौधरी यांचा मोठा मुलगा भावेश हा बाहेरील नागरिकांकडे मदतीसाठी याचना करीत होता. धूर आणि आगीत खिडकीजवळ येऊन तो काहीतरी करा, शटर तोडा, आम्हाला बाहेर काढा, आम्हाला वाचवा, असे ओरडत होता. मात्र, पूर्ण दुकान आगीत वेढल्याने बाहेरील नागरिक इच्छा असूनही काहीच करू शकत नव्हते. आगीची तीव्रता अधिक असल्याने शटर तोडून आत जाण्यासाठी अग्निशामक दलाला जवळपास अर्धा तास वेळ गेला. अग्निशामक दलाचे जवान त्यांच्यापर्यंत पोचण्यापूर्वीच चारही जण आगीत ओढले गेल्याने त्यांचा होरपळून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे शहर हळहळले. 
                 शॉर्टसर्किट किंवा घरातील तेलाच्या दिव्याने पेट घेतल्याने आग लागली अथवा इतर काही कारणांमुळे आग लागली याची चौकशी करण्यासाठीची समिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत गठीत करण्यात आली असल्याचे समजले. सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तातडीने समिती नेमल्याबद्दल प्रथमता: मी आपले आभारी आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दुकाने आणि हॉटेल्स सारख्या वाणिज्य आस्थापनांचे मालक अथवा कामगार हे दुकांनांमध्ये आणि हॉटेल्स मध्येच राहतात. पूर्णानगर येथील घटनेमुळे आशा ठिकाणी भीषण अपघात होऊ शकतात ही वस्तुस्थिती आता समोर आली आहे. शहरातील विविध वाणिज्य अस्थापनांमध्येच राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण शहरातील सर्व वाणिज्य आस्थापनांचे ठिकाणी फायर ऑडीट करण्याचे आदेश तातडीने द्यावेत व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात ही नम्र विनंती, सिमा सावळे यांनी केली आहे.