पवार कुटुंबात भेटीगाठी वाढल्या, भावाच्या घरी अजितदादा तर पुतण्या शरद पवारांच्या भेटीला

पवार कुटुंबात भेटीगाठी वाढल्या, भावाच्या घरी अजितदादा तर पुतण्या शरद पवारांच्या भेटीला

  मुंबई, (प्रबोधन न्यूज )   -      उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा सुरू असताना पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. रात्री उशिरा खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना अद्याप भेटलेले नाहीत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे बंधू श्रीनिवास यांच्याकडे गेले असल्याची माहिती समोर आलीय. तर श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र हा शरद पवार यांच्या भेटीला गेला आहे. राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या कौटुंबिक भेटीगाठींची चर्चा सध्या सुरू आहे.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक काल रात्री झाली. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाली. त्यानंतर आज अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर त्यांच्या गटाचे नेते आले आहेत. पण अजित पवार हे त्यांचे बंधू श्रीनिवास यांच्याकडे गेले आहेत. श्रीनिवास हे काल रात्री परदेशातून आले आहेत.अजित पवार यांनी ९ आमदारांसह शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गटातील नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. या टीकेने व्यथित होऊन सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास यांना फोन केला होता. तेव्हा श्रीनिवास हे परदेशात होते. तिथून ते काल रात्री मुंबईत आले असून आज अजित पवार हे त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र हा शरद पवार यांची वायबी सेंटरला भेट घ्यायला गेला आहे.

महायुतीची मंत्री मंडळ विस्तार आणि खाते वाटप करताना तारे वरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून चांगल्या खात्यांची मागणी राज्य मंत्री मंडळ विस्तार लाबण्याची शक्यता आहे. महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रवादी कॅाग्रेसमधील मंत्री अनुभवी आणि जेष्ठ मंत्री पद भूषवलेली आहेत. त्यामुळे त्यांना साजेसे मंत्री पद मिळावं अशी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची मागणी असल्याचंही म्हटलं जातंय.

काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत खाते वाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॅाग्रेस च्या मंत्र्यांना कसे खाते वाटप करायचे याचा फॅार्मुला ठरला. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजीत पवार आता त्यांच्या सहकारी मंत्र्यांची समजूत काढत असल्याची माहीती मिळत आहे.