भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सवाचा रसिकांनी लुटला आनंद

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सवाचा रसिकांनी लुटला आनंद

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - शास्त्रीय गायन, सरोद-सतारची जुगलबंदी, गझलगायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेल्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२३’ चे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या  हस्ते उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.


महापालिकेच्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी’च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर,
परिसरातील नागरिक आणि रसिकांच्या उपस्थितीत संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाने या महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटीया, सुप्रसिद्ध सितार वादक पंडित मोर मुकूट केडिया, ख्यातनाम सरोद वादक पंडित
मनोजकुमार केडिया आणि गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या विशेष उपस्थितीत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, विशेष अधिकारी किरण
गायकवाड, माजी शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, माजी प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. संगीत शिक्षक समीर सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे
निवेदन केले.


शहराच्या संस्कृतीत भर घालणाऱ्या, शहराचा सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करणाऱ्या आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने केले जात आहे. पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक
नगर आणि क्रीडानगरी असली तरी गेले २२ वर्षे कार्यरत असलेली शहरातील पिंपरी चिंचवड संगीत अकादमी देखील सांस्कृतिक क्षेत्रात आपली दैदीप्यमान कामगिरी करून महानगरपालिकेच्या नाव लौकिकात भर घालत आहे. नागरिकांनी शहराचे सांस्कृतिक वैभव
वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.

संगीत अकादमीचे विद्यार्थी रिषभ नहार, लेहरा, प्रथमेश चोपडे यांनी तबलावादन, यश भिसे, प्रसाद भाग्यवत यांनी तबलासहवादन, वैदेही घोलपकर, सुमेधा शिरसाठ यांनी सुगमसंगीत, भाग्यश्री मेश्राम, आशा भोंडे, सुवर्णा भोंडे यांच्या सहगायनाला हार्मोनियम वादक हरिभाऊ आसतकर, तबलावादक निखील वाघमारे यांनी साथ दिली.तसेच भारती डरोले यांच्या सुगमसंगीत गायनाला प्रथमेश चोपडे, हरिदास सावंत, सुमित पल्हाडे यांनी हार्मोनियमची तर निखील वाखमारे यांनी तबल्याची साथसंगत दिली.यानंतर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटीया यांनी शास्त्रीय गायन सादर केले. टीपेला जाणारा स्वर आणि विविध रागांची पेशकश सादर करून पंडित आनंद भाटीया यांनी मैफिल जिंकली. पंडित भाटीया यांनी गायलेल्या ‘भाग्यदा लक्ष्मी बाराम्मा’ या अभंगाला रसिकांनी भरभरून दाद दिली.


पंडित मोरमुकूट केडिया यांनी सितारवादन तर त्यांचे बंधू पंडित मनोजकुमार केडिया यांनी सरोदवादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. राग चंद्रनने सुरूवात करून केडिया बंधूंनी सरोद आणि सतारची जुगलबंदी पेश केली. रसिकांच्या टाळ्यांची साद आणि सरोद-सितारची जुगलबंदी असा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला. तबला वादकविनोद सुतार यांनी साथ संगत दिली.


गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, आयुष्य तेज आहे, तु नभातले तारे माळलेस का तेव्हा, मी किनारे सरकताना पाहिले, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय’ अशा भावमधूर गझला सादर करून रसिकांची मने
जिंकली. गझलगायिका डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी ‘करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय सोळा’, रोशनीचे कायदे पाळायचे, रात्र आली की दिवे जाळायचे अशा गझला सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, संगीत शिक्षक वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, उमेश पुरोहित, नंदीन सरीन, विनोद सुतार, संतोष  साळवे ,,  मिलींद दलाल, अरूण कडूस यांनी परिश्रम घेतले.