कलाकाराला लोकाश्रया बरोबरच राजाश्रय मिळणे गरजेचे : नाट्य अभिनेते प्रशांत दामले 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - कलाकाराला लोकाश्रया बरोबरच राजाश्रय पण मिळणे आवश्यक आहे, तरच ते आपली कला जोमाने सादर करतील, अशी अपेक्षा सिने नाट्य अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.
             अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचा १८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशांत दामले बोलत होते. अभिनेते राजन भिसे, विजय गोखले, सविता मालपेकर, गार्गी फुले, नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य समीर हंपी, सत्यजित धांडेकर, तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, बबनराव भेगडे, विलास काळोखे, सुरेशर साखवळकर आदी उपस्थित होते. दरम्यान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत दामले यांचा नटराजाची मूर्ती, रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमात 'आई कुठे काय करते फेम' अभिनेते मिलिंद गवळी व अभिनेत्री रुपाली भोसले यांचा कलागौरव पुरस्काराने; तर लेखक प्रभाकर ओव्हाळ, निसर्गमित्र विजय महाजन, अभिनेत्री सायली रौंधळ, पक्षीमित्र अविनाश नांगरे, गतिमंद मुलांच्या क्रीडा प्रशिक्षक नयनाताई डोळस यांचा विशेष गौरव अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते करण्यात आला.  
         पुरस्काराला उत्तर देताना रुपाली भोसले म्हणाल्या, की माझी रंगमंचावरची कारकीर्द नाट्य संमेलनातील कार्यकर्ती म्हणून झाली. सिनेमा आणि मालिकातून काम करताना आधी नाटकात काम करणे किती महत्त्वाचे आहे ते कळते.
         ज्या गावात कलाकार राहतात, कलेला प्रोत्साहन मिळते तिथली माणसे खूप सुखी असतात, असे मिलिंद गवळी यांनी सांगितले. राजन भिसे यांनी चित्रफितीद्वारे तळेगावातील नियोजित नाट्यगृहाविषयी माहिती दिली. सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविकात सांगितले, की हे नाट्यगृह लवकरात लवकर तळेगावकर रसिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी प्रशांत दामले यांनी मदत करावी. 
             दरम्यान, ओडीसी नृत्य अभ्यासिका संगीता राऊत गणेश वंदना सादर केली. पं. सुरेश साखळकर यांनी स्वागत, तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी व डॉ. विनया केसकर यांनी, तर नाट्य परिषदेचे सचिव प्रसाद मुंगी यांनी आभार मानले. 
          कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अ.भा.म.नाट्यपरिषद मावळ शाखेच्या तानाजी मराठे, विश्वास देशपांडे, राजेश बारणे, डॉ. मिलिंद निकम, नितीन शहा, अमित बांदल, गोपाळ परदेशी, कैलास केदारी, संग्राम जगताप, तेजस धोत्रे, क्षिप्रसाधन भरड, पूजा डोळस, प्रसाद मुंगी, सुरेश दाभाडे, डॉ. यशवंत वाघमारे, संजय वाडेकर, संजय चव्हाण, हरिश्चंद्र गडसिंग यांनी परिश्रम घेतले. विशेष गौरवार्थी अविनाश नागरे यांनी सर्व अतिथींना चिमण्यांची घरटी भेट दिली.