ते बारा आमदार अधिवेशनात पुन्हा गोंधळ घालणार ?

ते बारा आमदार अधिवेशनात पुन्हा गोंधळ घालणार ?

मुंबई, दि. 3 मार्च – जुलै 2021 मध्ये सभागृहात गोंधळ घातल्याने 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित केले होते. त्या विरुद्ध हे आमदार न्यायालयात गेले असता न्यायालयाने त्यांचे निलंबन रद्द केले. हे 12 आमदार आता आज होणाऱ्या अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. ज्या ओबीसी आरक्षणावरून या बारा आमदारांनी गोंधळ घातला ते आता नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून पुन्हा गोंधळ घालणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधिमंडळाच्या जुलै २१ च्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या मुद्द्यावरून भाजपने सभागृहात गोंधळ घालून सरकारची कोंडी केली होती. या गोंधळात सत्ताधारी विरोधक सभागृहात आमने-सामने आले होते. तत्कालीन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना अपशब्द वापरण्याचा प्रकार घडल्याने १२ आमदारांचे निलंबन करण्यात झाले. या आमदारांना विधिमंडळाच्या आवारात येण्यास एक वर्षासाठी बंदी होती. सरकारच्या निर्णयाला आव्हान देत या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या सुनावणीत न्यायालयाने सरकारचा निर्णय २८ जानेवारी रोजी रद्द ठरवला. परंतु, विधिमंडळाच्या कामकाजात न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नसल्याचा पवित्रा महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आमच्याकडे आहे. आम्ही निलंबित केलेले १२ आमदार अधिवेशनाला जाणारच आहोत, असे आशिष शेलार यांनी सांगितले. संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, हरीश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, पराग अळवणी, नारायणे कुचे, बंटी बागडिया आणि योगेश सागर अशी या बारा आमदारांची नावे आहेत. या आमदारांकडे या अधिवेशनात अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीचा कार्यक्रम सोपवल्याचे राजकीय वर्तुळातून समजले आहे. त्यामुळे आता हे आमदार किती गोंधळ घालणार आणि सरकार त्याला कसे तोंड देणार हे पाहावे लागेल.