गुन्हा दाखल करून गजानन चिंचवडेंचा छळ केल्याचा माजी खासदार अमर साबळेंचा गंभीर आरोप

गुन्हा दाखल करून गजानन चिंचवडेंचा छळ केल्याचा माजी खासदार अमर साबळेंचा गंभीर आरोप
पिंपरी - 
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले महाविकास आघाडी सरकारच त्यांचे मारेकरी असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार अमर साबळे यांनी शनिवारी केला. सहा महिन्यांपूर्वीच गजानन चिंचवडे यांनी शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने त्यांच्यावर 29 वर्षापूर्वीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करायला लावला. त्याचा तणाव आणि मानसिक खच्चीकरण झाल्याने गजानन चिंचवडे यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले, असा आरोप माजी खा. साबळे यांनी केला. 
 
गजानन चिंचवडे यांचे आज (शनिवारी) हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे, माजी नगरसेवक शंकर जगताप यांसह भाजपचे आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. चिंचवडे यांच्या निधनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कुटील डाव करत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
माजी खासदार अमर साबळे म्हणाले, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे व गजानन चिंचवडे यांच्यासह दहा जणांवर 25 जानेवारीला गुुन्हा दाखल झाला. चिंचवड गावातील राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराने 29 वर्षापूर्वीचे जमिन खरेदीचे प्रकरण बाहेर काढले. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या निकटवर्ती असल्याने या प्रकरणात पोलिस प्रशासनावर दबाव आणला गेला. चिंचवडे यांची पोलिसांनी उलट-सुलट चौकशी केली. तर काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे चिंचवडे तणावामध्ये होते. त्याच तणावातून त्यांचे स्वास्थ बिघडले व त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे साबळे यांनी सांगितले.

भाजपच्या चार नगरसेवकांवर गुन्हे दाखल 
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर प्रशासकीय ताकद वापरून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रणनीती आखली जात असल्याचा आरोप यावेळी भाजपने केला. याबाबत बोलताना पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, भोसरीतील नगसेवक राजेंद्र लांडगे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, माजी उपमहापौर केशव घोळवे व भाजपचे नेते गजानन चिंचवडे यांच्यावर गुन्हा दाखल करून राष्ट्रवादीने निवडणुकीच्या तोंडावर सूडाचे राजकारण सुरू केले आहे. मात्र या सूडाच्या राजकारणात आणखी किती राजकीय बळी घेतले जाणार आहेत असा सवाल ढाके यांनी उपस्थित केला.