150 देशांमधील 700 मंदिरांमध्ये हिंदूंची निदर्शने

150 देशांमधील 700 मंदिरांमध्ये हिंदूंची निदर्शने


बांगलादेशातील हल्ल्यांचा निषेध

ढाका - इस्कॉन मंदिरात केलेली तोडफोड आणि हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी बांगलादेशसह 150 देशांमधील सुमारे 700 मंदिरांमध्ये हिंदू भाविकांनी निदर्शने केली. यावेळी टाळ आणि ढोलकी वाजवून भजन-कीर्तनाद्वारे हिंदूंनी आपला निषेध नोंदविला.

बांगलादेशातील नोआखाली येथे मागील आठवड्यात इस्कॉन मंदिरात धर्मांध संघटनांकडून तोडफोड करण्यात आली होती. हिंदू भाविकांवरही हल्ले झाले होते. याविरोधात जगभरातील 150 देशांमधील 700 मंदिरांमध्ये विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. इस्कॉनच्या आवाहनावरून भाविक आंदोलन करत असून, आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय इस्कॉनने संयुक्त राष्ट्र संघटनाकडे (युनो) पत्र पाठवून, या घटनांची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

16 ऑक्टोबर रोजी एका जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला चढवला होता. मंदिर परिसरात तोडफोड केली होती. यात एका भाविकाचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली होती. धक्कादायक म्हणजे, या घटनेपूर्वी दुर्गादेवी उत्सवाच्या मंडपावरही हल्ले चढवण्यात आले होते. यात चार हिंदू भाविक मृत्युमुखी पडले, तर काहींच्या घरांना आग लावली होती.